नवनीत राणा यांचे रेल्वे मंत्र्यांना साकडे, मेळघाटातील आदिवासींना न्याय द्या
अमरावती : अकोला, अकोट, धूळघाट, डाबकामार्गे खंडवा ब्रॉडगेज रेल्वे लाईन परावर्तित न करता मेळघाटातून जुन्याच मार्गाने नेऊन मेळघाटातील आदिवासींना त्याचा लाभ मिळावा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना निवेदनातून केली आहे.
खासदार नवनीत राणा यांच्या माहितीनुसार, शेतकरी आणि नागरिकांची लाडकी लेकुरवाळी शकुंतला रेल्वे तातडीने सुरू करण्यासंदर्भात हालचाली वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. महानुभाव पंथीयांची काशी असणाऱ्या रिद्धपूर येथे अमरावती -नरखेड मार्गावरील रेल्वे स्टेशन स्थापित करण्यात यावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे. सुमारे दोन हजार लोकांना रोजगार देणाऱ्या बडनेरा येथील रेल्वे वॅगन कारखान्याचे काम संथगतीने चालू असून, ते तत्काळ मार्गी लावून पंतप्रधान व रेल्वे मंत्र्यांचे हस्ते लोकार्पण होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. अमरावती मॉडेल रेल्वे स्थानक, नया अमरावती स्टेशन व बडनेरा रेल्वे स्टेशनच्या नावीण्यपूर्ण विकासासंदर्भात चर्चा झाली. सकारात्मक पावले उचलण्याचे रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी खासदार राणा यांना आश्वासित केले.