रक्षाबंधनाची लगबग, कारागृहाच्या साहित्य, वस्तू विक्री केंद्रावर मिळतील राख्या
अमरावती : रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या अतूट नाताची वीण गुंफणारा पवित्र सण आहे. याच दिवशी बहीण-भावाच्या हाताला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. मात्र, पाषाण भिंतीच्या आत विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या महिला बंदी भावाला राखी बांधण्यापासून वंचित राहतील, असे असले तरी कारागृह प्रशासनाने रक्षाबंधनाचे औचित्य साधून कैद्यांसाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्याकरिता महिला बंद्यांच्या हातून राख्या तयार करण्यात येत आहेत.
रविवार, २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यवर्ती कारागृहात महिला बंदीजनांच्या हातून पुरुष बंदीजनांना राख्या बांधल्या जाणार आहे. कारागृहाच्या महिला बराकीत गत १५ दिवसांपासून महिला कैदी राख्या तयार करीत आहेत. महिला बंदीजनांना यापूर्वीच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राख्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कारागृह प्रशासनाकडून महिला बंद्यांना राख्या तयार करण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. या राख्या सुबक व आकर्षक आहेत. रक्षा बंधनाच्या दिवशी याच राख्या पुरुष बंद्यांना बांधण्यात येतील. कारागृहाच्या विक्री केंद्रात राखीचे स्टॉल लावण्यात येणार आहे. महिला बंद्यांनी तयार केलेल्या राखी विक्रीतून त्यांना रोजगार मिळणार आहे.
बॉक्स
सामाजिक संस्थांकडून रक्षाबंधन
कारागृहात विविध सामाजिक संस्थांकडून रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या उपक्रमात एनजीओ महिला या पुरुष बंदीजनांना राख्या बांधतात. मात्र, रक्षाबंधनासाठी लागणाऱ्या राख्या या कारागृहातून खरेदी करण्यात येतात. त्यामुळे कारागृहाच्या उत्पन्नात यानिमित्ताने वाढ होते. या कार्यक्रमात महिला कैदी पुरुष बंद्यांना राख्या बांधून भाऊ म्हणून रक्षणाची हमी घेतात, हे विशेष.
कोट
रक्षाबंधनाच्या दिवशी रक्ताचे नाती असलेली भाऊ-बहीण कारागृहात येऊ शकत नाही. त्यामुळे बंदिस्त असलेल्या पुरुष कैद्यांना महिलांच्या हातून राख्या बांधून हा सण साजरा केला जातो. जेणेकरून भावाला बहिणीची तर, बहिणीला भावाची उणीव भासू नये, हा यामागे हेतू आहे.
- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह.