लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मानवतावादी तत्त्वज्ञानाचे त्यांनीच नेमून दिलेले आजीवन प्रचारक केशवदास रामटेके गुरुजी (८०) यांचे शुक्रवारी वृद्धपकाळाने निधन झाले. मूळचे नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव येथील ते रहिवासी होते. १९५० साली नवेगाव पांडव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनाला आले असताना, आदर्श बाल सेवक म्हणून त्यांनी कौतुक केले होते.
१९५४ साली भारत नवनिर्माण विद्यामंदिरात प्रशिक्षणार्थी आदर्श खेड्यांच्या योजनेत दहा वर्षे सहभाग होता. १९५८ साली ४६०० मैल भारतभ्रमण पदयात्रा केली होती. २० नोव्हेंबर १९६७ साली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापना केलेल्या श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार प्रशिक्षण विद्यालयात प्रमुख प्रशिक्षक होते. तेव्हापासून सतत ३५ वर्षे प्रशिक्षण कार्य केले. ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे अनेक वर्षे संयोजक राहिले.
त्यांना सेवाकार्य करीत असताना जाती तोडो पुरस्कार, सेवायोगी पुरस्कार, राष्ट्रसंत सेवायोगी पुरस्कार आदींनी गौरविण्यात आले होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रसंतांच्या तत्त्वप्रणालीप्रमाणे व्यतीत केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी नेमणूक केलेल्या आदर्श आजीवन प्रचारकांपैकी केशवदास रामटेके गुरुजी हे एक होते. त्यांच्या निधनामुळे अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाची मोठी हानी झाली. त्यांचे संपूर्ण कार्य अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाला समर्पित होते.- जनार्दन बोथे गुरुजी, सरचिटणीस, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम