सीईटी मध्ये १०० टक्के, नीटमध्ये ६४४ गुण प्राप्त
चांदुर बाजार : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचसी-सीईटी) चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत एसईबीसी (मराठा) प्रवर्गातून केयूर गजानन देशमुख हा राज्यातून प्रथम आला आहे. त्याने या परीक्षेत १०० टक्के गुण प्राप्त केले. राज्यात १०० टक्के गुण प्राप्त करणाऱ्या १९ परीक्षार्थींमध्ये तो अकरावा मेरीट आहे. अमरावती जिल्ह्यातूनही पहिला आला आहे.
केयूरने नीट परीक्षेतही घवघवीत यश प्राप्त केले. त्याने ७२० पैकी ६४४ गुण प्राप्त केले आहे. तो राज्यात ३३२ वा मेरिट आला. पुण्याच्या बी.जे. मेडिकल काॅलेजमध्ये शासकीय कोट्यातून त्याने प्रवेश निश्चित केला आहे. त्याने मिळविलेल्या या यशामुळे तो इन्स्पायर स्काॅलरशिपचा मानकरी ठरला. त्याच्या या यशाबद्दल डॉ. पंजाबराव देशमुख विचार मंच, महाराष्ट्र राज्य वित्त व लेखा विभाग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घरी येऊन त्याला सन्मानित केले. स्वाध्याय परिवाराने त्याच्या निकालाबाबत समाधान व्यक्त केले. त्याने यशाचे श्रेय आई अनुराधा व वडील गजानन देशमुख तसेच गुरुजनांना दिले आहे.