अमरावती : वरूड तालुक्यातील बेनोडा, खडका, जामगाव, बारगाव, माणिकपूर, धामणदस, पळसोना आदी गावांत जोरदार पावसाने धुमाकूळ घातल्याने ऐन उन्हाळ्यात सर्वच नद्या-ओढ्यांना पूर आला आहे. खडका गावातून वाहणाऱ्या कुंड नदीला महापूर आल्याने तब्बल दोन तास गावाचा महामार्गाशी संपर्क तुटला होता.
वरूड तालुक्यात गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात जोरदार सरी कोसळल्या. पावसात थोड्याफार प्रमाणात गारांचाही पाऊस पडला. याशिवाय मध्य प्रदेशातील आठनेरसह गेहुबारसा, तसेच सातपुडा पर्वतावर चांगला पाऊस कोसळला. खडका येथील कुंड नदीचे उगमस्थान मध्य प्रदेशातील कुमुदरा येथे आहे. त्या परिसरात अतिवृष्टी झाल्याने सातपुडा पर्वतराजीतील पाणी नदीपात्रातून वाहून आले. पुरामुळे गावातून अमरावती- वरूड राज्य महामार्गावर येण्याचा मार्ग बंद झाला.
अचानक आलेल्या पुराने नदीकाठच्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. नशीब बलवत्तर म्हणून रात्रीऐवजी दिवसा पूर आला; अन्यथा मोठी हानी झाली असती.
-राहुल फुले, सरपंच, खडका (जामगाव)
--------------------