रस्त्यात सांडलेल्या ऑईलवर टाकली माती, संभाव्य अपघात टाळले
अंजनगाव सुर्जी : पोलीस कर्मचारी, त्यातही वाहतूक पोलिसांची अरेरावी, दंडेलीचे किस्से सर्वश्रुत आहेत. मात्र, त्यांच्यातही दुसऱ्यांच्या वेदनेने कळवळणारा पिता, बंधू असतो. अपघात टाळण्यासाठी तो वाहतूक पोलीस किरकोळ कामही आनंदाने करतो. माणुसकी जपणाऱ्या ‘खाकी वर्दी’चे दर्शन २० जून रोजी नागरिकांना घडले.
अंजनगाव-दर्यापूर रोडवरील सारडा इंग्रजी शाळेसमोर लोकांना पहावयास मिळाले. अज्ञात वाहनातून ऑइल रस्त्यावर सांडले होते. त्यामुळे रस्त्याचा पृष्ठभाग निसरडा झाला होता. त्या ऑईलवरून घसरून कोणत्याही वाहनाचा वा व्यक्तीचा अपघात होऊ नये, या उद्देशाने वाहतूक पोलीस हवालदार विनय कांबळे (बक्कल क्रमांक २५०) यांनी स्वतःच्या हाताने रस्त्याच्या कडेची माती उचलून त्या ऑईल पसरलेल्या रस्त्यावर टाकली. एरवी दंडाच्या भीतीने घाबरणाऱ्या चालकांपैकी काहींनी वाहन थांबवून या कृतीसाठी विनय काळे यांना धन्यवाद दिले.