अमरावती : येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होत असून, शहर आयुक्तालय हद्दीतील ७९१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. पोलिस आयुक्तालय अमरावती शहर हद्दीमध्ये चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश येतो. यात धामणगाव विधानसभा मतदारसंघासाठी पाच, बडनेरासाठी ३४४ मतदान केंद्र, अमरावती विधानसभेसाठी ३४५ तर, तिवसा विधानसभा निवडणुकीसाठी ९७ मतदान केंद्राचा समावेश आहे.
निवडणूक बंदोबस्ताकरिता अमरावती शहरात १,७२४ पोलिस अधिकारी व अंमलदार नेमण्यात आले आहेत. तसेच, बाहेरून सीआरपीएफ, एसएपी, एसआरपीएफ, बीएसएफ अशा कंपन्या व मध्य प्रदेश येथून ५०० व अमरावती येथून १०० होमगार्डस् प्राप्त झाले आहेत. या कंपनींचा स्ट्रॉग रूम, ईव्हीएम सुरक्षा, संवेदनशील परिसर पेट्रोलिंगसाठी तर, ठाण्यातील आरसीपी व क्यूआरटी पथकाचादेखील निवडणूक बंदोबस्तात वापर करण्यात येणार आहे. दरम्यान, दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपुष्टात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात गस्त पथके वाढविण्यात आली आहेत. यादरम्यान, रात्री ११ वाजतानंतर कोणीही जमाव करू नये तसेच, विनाकारण फिरू नये, त्याप्रमाणे, व्यापाऱ्यांनी आपापली आस्थापना वेळेवर बंद करावी. तसेच, सोशल मीडियावर आक्षेपार्ह चित्रफित व संदेश तसेच व्हिडीओ चित्रफिती प्रसारित करू नये. त्याचप्रमाणे, कोणत्याही धर्मामध्ये तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारची चित्रे, व्हिडीओ, आक्षेपार्ह व्यक्तव्य प्रसारित होणार नाही, त्याकरिता सायबर पोलिस २४ बाय ७ तत्पर आहे.
अशी राहील मद्यविक्रीस बंदी
निवडणूक कालावधीत दिनांक १८ नोव्हेंबरचे सायंकाळी ६ ते २० नोव्हेंबर मतदानाचा संपूर्ण दिवस तसेच, दिनांक २३ नोव्हेंबर या मतमोजणीच्या दिवशी अमरावती आयुक्तालय कार्यक्षेत्रात सर्व प्रकारची मद्यविक्री करण्यास बंदी करण्यात आली आहे. यादरम्यान, अवैध व्यवसाय व दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध प्रभावी कार्यवाही करण्यात येणार आहे