प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांनी पुढाकार घ्यावाअमरावती : अंबानगरीचे वैभव असलेला ऐतिहासिक खापर्डेवाडा संपविण्याचा घाट रचण्यात येत असून रोज या वाड्याची इमारत पाडण्यात येत आहे. वाडा क्षतिग्रस्त करण्यात येत आहे. त्यामुळे अंबानगरीचा हा वैभव असलेला खापर्डेवाडा वाचविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. श्रीमंत दादासाहेब खापर्डे हे विदर्भाचे ख्यातनाम वकील होते. राजकमल चौकात त्यांचा ऐतिहासिक वाडा आहे. या वाड्यातून देश स्वतंत्र्याच्या चळवळी झाल्या. त्याकाळी अनेक देशभक्तांनी येथे भेट दिली. त्यामुळे या वाड्याचे जतन करण्याचीे मागणी जुनीच आहे. पण या वाड्याचे जतन तर सोडा मात्र हा वाडा अज्ञात व्यक्तींकडून रोज काही भाग पाडण्यात येत आहे. येथून नागरिकांचा रोज ये-जा असते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सदर वाड्याची पूर्ण इमारत अद्यापही सुस्थितीत व मजबूत असताना वाड्याची समोरच्या भागातील इमारत खचतेच कशी, असा प्रश्न पुढे येत आहे. अनेक वर्र्षींपासून या वाड्याची इमारत पाडण्याचा व वाडा क्षतिग्रस्त दाखविण्याचा घाट रचण्यात येत आहे. सदर वाडा हा दादासाहेब खापर्डे यांच्या वंशजांनी एका खासगी बिल्डरला विकल्याची माहिती आहे. पण या वाड्याची खरेदी शासकीय नियमानुसार झाली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी व महापालिकेच्या आयुक्तांनी या वाड्याची खरेदीची तपासणी केली पाहिजे. हा वाडा ऐतिहासिक असून वाड्याची जागा अधिग्रहीत करण्याचा नियमानुसार अधिकार हा महापालिकेला आहे. ही अंबानगरीतील ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला तर या वाड्याचे जतन होऊ शकते. शेगाव निवासी श्री संत गजानन महाराजांचे पदस्पर्श या वाड्याला लागल्यामुळे या वाड्याला अध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे. वाड्याचे जतन करून श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांचे भव्य स्मारक येथे व्हावे, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)
खापर्डेवाडा संपविण्याचा घाट!
By admin | Published: April 09, 2017 12:09 AM