३०० वर्षांच्या परंपरेला मुकणार : दोन वर्षांपासून प्रश्न रखडलासंजय खासबागे वरुडखापरखेडा हे गाव पंढरी प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रात गेले. ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, समाजभवन बांधून खापरखेड्याचे खराड ग्रामपंचायत म्हणून पुनर्वसन करण्याची तयारी केली. मात्र, पुनर्वसित नागरिकांसाठी शासनाकडून केली जाणारी प्रारंभिक व्यवस्था तसेच जुन्या गावातील मालमत्तेचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने ग्रामवासी मात्र चिंतेत पडले आहेत.अनेक पिढ्यांपासून या गावाशी नाळ जुळल्याने गाव सोडताना डोळयातून आसवे थबकतात. धरणग्रस्त खापरखेडावासीयांना पुनर्वसनाची आस लागली असली तरी ३०० वर्षांच्या आठवणींना पाठ देताना डोळयात आसवे दिसून येतात. परंंतु ग्रामपंचायतीने १५ आॅक्टोबरला सूचनापत्र देऊन गाव खाली करण्याचे सांगितले आहे.बेल नदीच्या तीरावर खापरखेडा हे एक गाव मध्य प्रदेश- महाराष्ट्र सीमेवर वसले आहे. आजमितीस या गावात ४७ कुटुंबे वास्तव्याला आहेत. कसे वसले हे कोणाला माहीत नसले तरी चार पिढ्यांपेक्षा अधिक पिढ्या या गावाने बघितल्या आहेत. पूर्णत: नैसर्गिक वातावरणात राहणाऱ्या या गावांचा शेती आणि शेतमजुरी हा मुख्य व्यवसाय आहे. ४२ घरांची ५१ कुटुंबांची या गावात वस्ती आहे. त्यात २०६ नागरिक आहेत. हे गांव आडवळणावर असलं तरी सर्वधर्म समभाव या गावाने जोपासला आहे. २०६ लोकांमध्ये ७५ जण अनुसुचित जातीचे, ४५ अनुसूचित जमातीचे, ८६ इतर मागासवर्गीय नागरीक आहेत. परंतु या गावाने जाती व्यवस्था कधी जोपासली नाही.या गावाला एक जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा असून दोन शिक्षक आहेत. त्यापैकी पहिल्या वर्गात चार, दुसऱ्या वर्गात चार, तिसऱ्या वर्गात चार आणि चौथ्या वर्गात चार विद्यार्थी आहे. गावामध्ये एक अंगणवाडी असून त्यामध्ये १० बालके दाखल आहे. या गावाला मनोरंजन माहिती नाही. कामे आटोपली की लोक नदी तिरावरील हनुमानजीच्या मंदिरात गप्पा मारतात. या गावामध्ये बहुतेक कुटुंब शेकडो वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातून स्थलांतरित झाली आहेत. त्यांची चौथी पिढी सद्यस्थितीत आहे. गेल्या तीन पिढ्यांत या गावाने वीज बघितली नाही. चौथ्या पिढीमध्ये वीज आली; पण रात्री कधी विजेचे दिवे लागलेच नाही. गत दोन वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे. शासनाने कितीही पैसे देऊन पुनर्वसन केले तरी जन्मभूमी आणि कर्मभूमी सोडताना आम्हाला समाधान मात्र मिळणार नाही, असे वृध्दांनी सांगितले. कारण गाव मोडकं तोडकं असले तरी या गावाने प्रेम दिले. जन्मभूमी ही कर्मभूमी झाली. जिवाभावाची माणसे जोडल्या गेली. ती सोडुन जाण्याच्या अती वेदना खापरखेडावासीयांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहेत गेल्या चार पिढ्या शासनाने गावाला आधार दिला नाही. या गावातून उठविण्याचे काम मात्र सरकार करीत आहे. आणि तेसुद्धा निराधार करून त्याचे शल्य बोचत असल्याची भावना म्हातारी माणसं बोलुन दाखवीत आहेत. ३०० वर्षाच्या परंपरेला खापरखेडा वासिय मुकणार असल्याने आजही या गावाविषयीच्या प्रेमामुळे डोळयात आसवे दिसून येतात. पुनर्वसनाचे भयावह संकटपंचवार्षिकमध्ये पुसला ते खापरखेडा हा डांबरी रस्ता तयार झाला. परंतु इतर विकासकामे गावाने बघितली नाहीत. असं हे गाव पंढरी मध्यम पकल्पामुळे आता बुडीत क्षेत्रात गेले आहे. ऊन, वारा, पाऊस आणि नापिकीचा सामना करीत आलेल्या या नागरिकांसमोर आता मात्र पुनर्वसनाचे भयावह संकट उभे ठाकले आहे. पंढरी मध्यम प्रकल्पामुळे हे गाव बुडीत क्षेत्रात गेले आहे. याप्रकल्पामुळे गावाचा रस्ताच बंद झाला. त्यामुळे या गावाचे पुसला पुनर्वसनाशेजारी खराड शेतशिवारात पुनर्वसन झाले आहे. वारस हक्काचा मोबदला नाहीयेथे शासनाने पाण्याची टाकी, नाल्या, रस्ते, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, समाजभवन बांधले. गत दोन वर्षांपासून बांधकाम करुन प्लॉटचे ले-आऊट टाकून ठेवले. परंतु पुनर्वसित खापरखेडावासीय आलेच नसल्याने रस्ते, नाल्यांची दुर्दशा झाली. नागरिकांना केवळ भूखंड देण्यात येणार असून यामध्ये शेतकऱ्यांना चार हजार चौरस फूट तर बिगरशेती रहिवाशांना दोन हजार चौरस फूट जागा देण्यात आली. मोबदला मात्र शासन शासकीय दरानुसार मूल्यांकन करून अडीच ते दोन लाखांपर्यंत मोबदला देण्यात आला. परंतु काही कुटुंबांना वारसहक्काच्या तांत्रिक अडचणीमुळे मोबदला मिळण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत पुनर्वसनानंतर घरे कशी बांधायची, प्रपंच कसा सांभाळायचा या चिंतेने लोक भयभित झाले आहे. शेती उद्योगाला खीळ बसण्याची शक्यताशेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिक प्रमाणात मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या सिमेवर असल्याने पंढरी मध्य प्रकल्पामुळे शेतात जाणारे रस्ते बंद होत असल्याने आधी रस्ता तयार करा मगच आम्ही पुनर्वसित होतो, असा पवित्रा घेतल्याने शासनाने रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे नागरिक सांगतात. मात्र अद्यापही रस्त्याचे काम सुरू झाले नाही. यामुळे शती उद्योगालासुध्दा खीळ बसण्याची शक्यता आहे.
खापरखेड्याला पुनर्वसनाची आस
By admin | Published: January 06, 2016 12:12 AM