अनास्था : सरकार गाफील, बँका निवांतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ होईपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तातडीने दहा हजार रूपयांचे कर्ज देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. मात्र आदेश आणि परिपत्रकांच्या नादात खरीप हंगाम लोटला तरी हे दहा हजार रूपये शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत त्यामुळे सरकार गाफील, तर बँका निवांत राहिल्या आहेत.राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला तरी याचा शेतकऱ्यांना कसलाच अद्याप फायदा झालेला दिसून येत नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी तत्काळ दहा हजार रूपयांचे कर्ज मिळावे, यासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच बँकांनी तत्काळ दहा हजार रूपयांचे कर्जवाटप करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र या आदेशाला राज्यातील काही बँका सोडल्या तर सर्वच बँकांनी केराची टोपली दाखविली होती. त्यामुळे कर्जमाफीही नाही आणि नव्याने कर्जही नाही अशी शेतकऱ्यांची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. त्या पार्श्वभूमिवर आरबीआयने आता बँकांना पत्र पाठविले असून कर्जवाटप करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र आता खरीप हंगाम संपण्याच्या स्थितीत आला आहे. दुसरीकडे काही बँकांनी यापूर्वी शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचे कर्ज वाटप केले होते.काही ठिकाणी अद्यापही बँकांनी मात्र शेतकऱ्यांसह शासनालाही ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे कर्जवाटप न करणाऱ्या बँकांवर आता शासन काय कारवाई करणार असा प्रश्न आता शेतकरी वर्गातून होत आहे.
परिपत्रकांच्या नादात खरीप हंगाम लोटला, १० हजार मिळेनात
By admin | Published: July 17, 2017 12:11 AM