अमरावती अपर आयुक्त अंतर्गत १२ जिल्ह्यांचे नियोजन, संचारबंदीतही कर्तव्याला प्राधान्य
अमरावती : लॉकडाऊनमध्ये रोजगार हिरावलेल्या आदिवासी कुटुंबीयांना आर्थिक बळ मिळावे, यासाठी आदिवासी विकास विभागाने खावटी अनुदान लागू केले. त्याअनुषंगाने अमरावती अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत १२ जिल्ह्यांत ५७ हजार आदिवासी कुटुंबीयांना प्रतिदाेन हजार रुपयांप्रमाणे अनुदान मिळणार आहे. या अनुदानाची डीबीटी करण्यात आली असून, येत्या आठवड्यात बँक खात्यात ही रक्कम वळती करण्यात येणार आहे.
अमरावती एटीसी अंतर्गत खावटी अनुदानासाठी २ लाख ८ हजार लाभार्थ्यांचे लक्ष्यांक असून, १ लाख ६४,१८५ लाभार्थ्यांची प्रत्यक्षात निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ५७ हजार ७८ लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या आठवड्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच ४४ हजार लाभार्थी मंजुरीची कार्यवाही प्रकल्प अधिकारी स्तरावर वेगाने सुरू आहे. खावटी अनुदानासाठी पात्र लाभार्थी आदिवासी पुन्हा अर्ज करू शकतील. अर्जाचा नमुना शासकीय किंवा अनुदानित, शासकीय वसतिगृहात, प्रकल्प अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. सेवाभावी संस्थांनीसुद्धा आदिवासी बांधवांना खावटी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------
खावटी अनुदानापासून पात्र लाभार्थी आदिवासी कुटुंब वंचित राहू नये, याची काळजी घेण्यात येत आहे. त्यानुसार संचारबंदीतही वेगाने कामे सुरू आहे. त्याकरिता प्रकल्प अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. खावटी अनुदानासाठी नव्याने अर्ज करता येतील.
- विनोद पाटील, अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग, अमरावती.
-------------------
प्रकल्पनिहाय मंजूर खावटी अनुदान
अकोला- १० हजार ८२३
औरंगाबाद- १ हजार ७९२
धारणी- ५ हजार ६७८
कळमनुरी- ८ हजार ५४०
किनवट- ४ हजार ६१३
पांढरकवडा- १९ हजार ६५४
पुसद- ५ हजार ९७८