अमरावती : शारदानगरमधून अपहरण करण्यात आलेल्या मुलाला पोलिसांनी अहमदनगर येथे जाऊन शोेधून काढला. तो सुखरूप असल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी मुलाच्या आई-वडिलांना देताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अपहरणामध्ये सहभागी असलेल्या मुलाचे अपहरण करणाऱ्या पुरुष व महिला आरोपींसह अन्य दोन अशा एकूण चार आरोपींना अहमदनगर गुन्हे शाखा व राजापेठ ठाण्याच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अहमदनगरमधून शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले. शनिवारी पहाटे ते मुलाला व आरोपीला घेऊन अंबानगरीत पोहचणार आहेत.
पोलीस सूत्रानुसार, मुलाचे अपहरण करणारी महिला आरोपी हीना देशपांडे (३२, रा. अहमदनगर), तिचा २६ वर्षीय साथीदार तसेच या घटनेत सहभागी अन्य दोन अशा चार आरोपींना अहमदनगर शहराच्या विविध भागांतून ताब्यात घेण्यात आले. चारही आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कोठडी घेण्यात येणार आहे. ही कार्यवाही पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव, राजापेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्यासह राजापेठ पोलिसांचे चार पथक, गुन्हे शाखेचे तीन पथक व अहमदनगर गुन्हे शाखेच्या पथकाच्या अथक परिश्रमातून ४४ तासांच्या आत पोलिसांनी या घटनेचा छडा लावला.
बॉक्स:
आजीवरच संशयाची सुई
अचानक आजीसोबत फिरत असताना मुलाचे तिच्या डोळ्यांदेखत अपहरण होते. तेव्हा आजीने कुठलीही आरडाओरड केली नाही किंवा नातवाचे अपहरण झाल्यानंतरही तिच्या मनात कुठल्याही भीतीची भावना पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळून आली नाही. त्यामुळे पोलिसांची आजीवरच संशयाची सुई असल्याने गुरुवारी तिचा जबाब नोंदवून शुक्रवारी सकाळीच आजीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. अहमदनगरवरून ताब्यात घेण्यात आलेली हीना नावाची आरोपी महिला ही आजीच्या ओळखीतील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच आजीचे माहेर हे अहमदनगर असल्याने अपहरणामध्ये आजीचा तर सहभाग नाही ना? अशी संशयाची सुई पोलिसांना जाणवली असून, त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. आरोपीचा पीसीआर घेतल्यानंतर सर्व घटनेचा उलगडा होईलच तसेच या घटनेचा मास्टर माईंड कोण? व कशासाठी मुलाचे अपहरण केले, ही बाबसुद्धा समोर येईलच.
बॉक्स:
आसिफ पळाला
अहमदनगर जिल्ह्यातील सेहगाव येथे आसिफ नावाच्या आरोपीच्या घरी अपहरण करण्यात आलेल्या मुलाला ठेवल्याची माहिती गुन्हे शाखा व राजापेठ पोलिसांना मिळाली. दोन्ही पथके त्याच्या सेहगाव येथील घरी पोहचले. त्याच्या घरी पोलीस आल्याची माहिती त्याला मिळताच तो पळून गेला. गुन्हा केल्यानंतर चार वर्षीय मुलाला आसिफच्या घरी ठेवले होते, असा संशय पोलिसांना आहे. मात्र, मुलाला अहमदनगर शहरात सुखरूप ताब्यात घेतल्याचे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले.
बॉक्स:
खंडणीसाठी अपहरण केल्याचा संशय
चार वर्षीय मुलाला शारदानगर येथून दोन आरोपींनी बुधवारी रात्री शारदानगर येथून अपहरण केले. रविनगरातून ऑटोमध्ये बसून ते वेलकम पॉइंटवर पोहचले. त्यानंतर ते थेट अहमदनगर येथे मुलाला घेऊन गेले. येथे आणखीन तीन ते चार आरोपींच्या मदतीने मुलाला एका इसमाच्या घरी ठेवण्यात आले. हा गुन्हा खंडणी वसूल करण्यासाठी केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. कारण, अपहरण झालेल्या मुलाचे आजोबा फळाचे मोठे व्यापारी आहेत. तसेच वडील व काकांचा सायकल विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. त्या कारणाने खंडणीकरिता मुलाचे अपहरण करण्यात आल्याची दाट शक्यता असल्याचे मत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. लवकरच अपहरण का करण्यात आले व कुणाकुणाचा सहभाग आहे, हे स्पष्ट होणार आहे.
कोट
अहमदनगर शहरातून सदर चार आरोपींना ताब्यात घेतले. यात दोन अपहरण करणाऱ्या आरोपींचाही समावेश आहे. खंडणीसाठी अपहरण केले असावे, त्या दिशेने तपास सुरू आहे. मुलाच्या आजीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
आरती सिंह, पोलीस आयुक्त