फोटो पी २० जनुना
पान २ ची बॉटम
परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जनुना गावातील लोक कोरोनापेक्षा किडनीच्या आजारानेच अधिक त्रस्त आहेत.
दोन वर्षात किडनीच्या आजाराने गावातील नऊ लोक दगावल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावातील अन्य दोन रुग्ण डायलिसिसवर आहेत. त्यातील एकाची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्यामुळे तो डायलिसिसपासून दूर आहे.
स्टोनसह किडनी स्टोनने गावातील काही लोक आजही त्रस्त आहेत. यातील काहींवर अमरावती येथील खासगी डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू आहेत. गावात बोअरचे क्षारयुक्त पाणी पिण्यात आल्याने किडनी आणि स्टोनचे आजार वाढत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
दरम्यान किडनीच्या आजाराने जनुन्यात झालेले मृत्यू आणि किडनी स्टोनसह अन्य स्टोनच्या आजाराच्या रुग्णांबाबत आरोग्य विभागासह पंचायत प्रशासनाने हात वर केले आहे. तसे मृत्यू आणि रुग्ण जनुन्यात नाहीत. असल्यास तशी यादी गावकऱ्यांनी पुरवावी. आवश्यक त्या उपाययोजना करता येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाणी तपासणी प्रयोग शाळेकडून प्राप्त अहवालात जनुना येथील पाणी पिण्यायोग्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तेथील पाणी तपासणीत रासायनिक आणि जैविक अहवाल योग्य असून त्यातील टीडीएस आणि नायट्रेटचे प्रमाण योग्य असल्याचा निर्वाळा प्रयोगशाळेने दिला आहे.
बॉक्स
शहानूरचे पाणी द्या
जनुना गावातून, शहानूर धरणावरून अंजनगावकडे पाणीपुरवठा करणारी जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन गेली आहे. यातून गावाला पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. बोअरवेलच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्याचे ही मागणी करताना म्हटले आहे. या गावासह लगतच्या परिसरात रुग्णांना औषधी देणारा डॉक्टर या अनुषंगाने चर्चेत आला आहे. त्याविषयी परिसरात मतभिन्नता असून त्यावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. संबंधित डॉक्टर खरा की, खोटा याच्या चौकशीची आणि त्यावर कारवाई करून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणीही केली जात आहे.
कोट
किडनी आजाराने मृत्यू झाल्याची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डला नाही. गावकऱ्यांना शुद्ध पेयजल मिळावे म्हणून आरओ मशीन प्रस्तावित करण्यात आली आहे. शहानूर पाणीपुरवठा योजनेतून गावकऱ्यांना पाणीपुरवठा करावा म्हणून जीवन प्राधिकरण विभागाला पत्र दिले आहे. गाव पातळीवर किडनी रुग्णांची माहिती गावकऱ्यांकडून घेऊ.
- प्रशांत हिवे, ग्रामविकास अधिकारी
कोट २
जनुना येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात किडनीच्या आजाराचे रुग्ण नाहीत. तेथील पाणी पिण्यास योग्य आहे.
- व्ही. एन. किचंबरे, आरोग्य विस्तार अधिकारी
कोट३
आरोग्य किंवा पंचायत विभागाकडून तशी माहिती नाही. जनुना येथील किडनी रुग्णांची माहिती घेण्यात येईल. तसे रुग्ण आढळल्यास आवश्यक उपाययोजना आणि औषधोपचारांच्या सुविधा केल्या जातील.
- जयंत बाबरे,
गटविकास अधिकारी, पंचायत समिती अचलपूर