धारणी : शहरातील वादग्रस्त सर्वे नंबर १२६ अर्थात गुजरी बाजारात पुन्हा घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याकडे स्थानिक नगरपंचायत प्रशासनाने सोईस्कर दुर्लक्ष चालविले आहे.
येथील अतिक्रमण नगरपंचायतद्वारे काढण्यात आले होते. त्यानंतर दहा ओटे आणि रस्त्याचे अंतर्गत काम पूर्णत्वास आले. मात्र सदरचे ओटे जाहीर लिलावाद्वारे देण्यापूर्वीच ओट्यावर लोकांनी अवैधरीत्या ताबा चढविला. त्याचप्रमाणे पूर्वी झाल्याप्रमाणे लोकांनी टीनशेड आणि पक्के ओटे बांधून गुजरी बाजारावर पुन्हा अतिक्रमण केले आहे. या बाजाराचा पश्चिमेकडे सर्व बाजारातील केरकचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, माशांच्या प्रादुर्भावामुळे संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. नुकतेच नगरपंचायतद्वारे कचरा हटाओ मोहीम अंतर्गत अंदाजे दीड कोटी रुपयांचा कंत्राट देण्यात आलेला आहे. मात्र, या घाणीकडे सदर कंत्राटदाराचे दुर्लक्ष असून या माध्यमाने शहरात संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपंचायतीने याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी जनतेची मागणी आहे.