दुर्गंधीमुळे रुग्ण त्रस्त, पदे रिक्त, समाजवादी पक्षाने दिला आंदोलनाचा इशारा
मोर्शी : येथील उपजिल्हा रुग्णालयात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या घाणीच्या दुर्गंधीमुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत. याशिवाय रिक्त पदे तातडीने भरावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे मोर्शी शहर अध्यक्ष अजहरुद्दीन यांच्या नेतृत्वात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजय कळसकर यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.
रुग्णालयाच्या आतील व बाहेरील परिसर नेहमीसाठी स्वच्छ ठेवावा. या ठिकाणी रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून मोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. मात्र या ठिकाणी अद्यापही पुरेशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नसल्याने साथीच्या आजारांच्या रुग्णांनासुद्धा अमरावती येथे रेफर करण्यात येत आहे. त्यातच रुग्णालयातील घाणीच्या साम्राज्याने त्यात आणखी भर टाकली आहे. मोर्शी तालुक्यात सध्या डेंग्यूचे व इतरही साथीच्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. याला शहरातील अस्वच्छता व डासांचा उद्रेक डेंगू आजाराला कारणीभूत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत मोर्शी शहरातील चार व बेलोना येथील एका शाळकरी विद्यार्थ्याचा डेंगूसदृश आजाराने मृत्यू झाला. अनेकांना ताप येऊन शरीरातील पेशी कमी होत आहेत. परिणामी गोरगरीब नागरिकांना आपला रुग्ण सरकारी दवाखान्यात भरती करून उपचार घ्यावा लागत आहे. मात्र, उपजिल्हा रुग्णालय घाणीच्या विळख्यात सापडले असताना घाणीच्या दुर्गंधीमुळे रुग्णांचा जीवन-मरणाशी संघर्ष सुरू आहे. इतकेच नव्हे तर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी व इतरही कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या ठिकाणी सुविधा पुरविण्यात येत नाही. आरोग्य प्रशासनाच्यावतीने रुग्णालयात साफसफाई ठेवण्यात येऊन रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावी, अशी मागणी अजहरुद्दीन कमरोद्दीन यांच्यासह तालुकाध्यक्ष साबीर बेग, जिल्हा सचिव सैयद दानिश अली, तालुका उपाध्यक्ष रहमत खान, तालुका सचिव सैयद अफसर अली, तालुका सचिव शोएब मलिक, शहर सचिव असलम खान, शहर सचिव रेहान अहमद, शहर उपाध्यक्ष सोहेल शेख, शहर उपाध्यक्ष तेजस वानखडे, मीडिया प्रमुख सैयद आर्जेब अली, युनूस अली यांनी केली आहे.