राजुरा बाजार : सोयाबीन पीक अंतिम टप्प्यात असताना सोयाबीन पिकावर एकाएकी केसाळ अळीने धुमाकूळ घातला. त्यामुळे वाडेगाव शिवारात सोयाबीनच्या शेतात अळ्यांचा सडाच पडल्याने पीक संकटात सापडले आहे. एकाच रात्रीतून पीक फस्त केल्याचे पाहणीअंती स्पष्ट झाले.
पाच वर्षापासून सोयाबीन पीक दगा देत असून, निव्वळ उभ्या पिकात ट्रॅक्टरने रोटाव्हेटर फिरवावा लागत होता. एलो मोझॅक, व्हायरस, खोडमाशी यामधून वाचलेले सोयाबीनचे शेत अळींनी फस्त केले. परंतु यावर्षी सोयाबीन पिकातील मोजक्या व्हेरायटी चांगल्या बहरात असताना भरगच्च शेंगा लागलेल्या आहे. त्यामुळे आर्थिक संकटातून यावर्षी कसेबसे सावरण्याची आशा शेतकऱ्यांना लागली होती. सोयाबीनचे संशोधित वाण बऱ्यापैकी सोयाबीन शेंगांनी बहरलेली होती. सोयाबीन पीक हे ९० ते १०० दिवसाचे आहे. त्यातील ७५ ते ८० दिवस झाले आहे. परंतु वाडेगाव, काटी, नांदगाव, गाडेगाव, वंडली, वडाळा, वघाळ शिवारात लष्करी अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, हिरवी उंटअळी, केसाळअळी अशा बऱ्याच अळ्या पडल्या आहेत. एका सोयाबीनच्या झाडावर ७० ते ७५ अळ्या दिसत आहेत. वाडेगाव येथील एका सोयाबीनच्या शेतात एकाच रात्रीतून हल्लाबोल करीत अळ्यांनी अवघे पीक फस्त केले आहे. कुठे-कुठे तर पाने, शेंगा अळीने फस्त केल्याचे दिसत आहे. निव्वळ झाडाचा सांगाडा शाबूत असल्याचे दिसत आहे. महागडे कीटकनाशके फवारूनही निष्प्रभ ठरत आहे.
बॉक्स
शेतकऱ्यांच्यानी हे करावे
सोयाबीनचे पीक आता अंतिम टप्प्यात असताना शेतकऱ्यांनी सतर्क राहून १० लिटर पाण्यात ५ ग्राम इमामेकटींन बेंझोइट अधिक कार्बेन्डाझिम १५ ग्रॅम अधिक निंबोळी अर्क अळ्यांचा प्रकार पाहून खोडमाशी, उंटअळी, स्पोडेथेरा अळीकरिता इंडोक्साकार्ब १८.५ टक्के प्रवाही ८ मिली तर घाटे अळी, चक्रीभुंगा, लष्करी अळीकरिता फ्लूबंडामाईड ३९.३५ टक्के प्रवाही ३ मिली फवारणी तातडीने करावी, असे वरूड पं.स.चे कृषी अधिकारी आर.बी. सावळे यांनी सांगितले.
कोट
चार दिवसाआधी कीटकनाशकाची फवारणी केली. तेव्हा अळींचा प्रकार नव्हता. एक-दोन दिवसात लष्करी अळीने पूर्ण शेतातच नव्हे तर अवघ्या शिवारात नुकसान चालविले आहे.
- राजाभाऊ सोनारे, शेतकरी,वाडेगाव