अमरावती : शहराचे पूर्वेकडील प्रवेशदार समजले जाणाऱ्या रहाटगाव येथील मुख्य रस्त्याची दीड वर्षापासून डागडुजीअभावी अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. नागपूर महामार्गापासून गावातील जुन्या वस्तीपर्यंत मुख्य रस्त्याला मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. त्यातच पावसाचे पाणी साचून हे खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत.
चाळण झालेल्या रस्त्यातून मार्गक्रमण करताना नागरिकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. कामावर जाणारे स्त्रिया तसेच वरिष्ठ नागरिक दुचाकी चालवताना घसरून पडल्यामुळे जखमी होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. महामार्गापासून शहराला शेगावमार्गे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने रहदारी खूप वाढलेली आहे. त्यातच खड्डेमय रस्त्यांमुळे अपघात व प्रदूषण वाढीस लागले आहे. एकीकडे शहरातील सर्व भागात सिमेंटची दोन - दोन फूट उंच रस्ते झाले. मात्र, रहाटगाव येथील रस्त्याचे साधे डांबरीकरणही होत नसल्यामुळे हा भाग अत्यंत भकास अवस्थेत आहे. शासनाने या रस्त्याचे पक्के बांधकाम त्वरित करून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.