अमरावती : ठाकरे सरकारच्या नेत्यांचे घोटाळे उघड करण्याची जबाबदारी जनतेनं मला दिली असून, पुढील काही दिवसात ठाकरे सरकारमधील चार नेते, मंत्र्यांची चौकशी होईल, असे भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले. ते आज अमरावती दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते.
गेल्या १२ महिन्यात या सरकारचे १०० घोटाळे बाहेर आले. त्यातील २४ घोटाळ्यांचा हिशोब दिला आहे. ठाकरे सरकारचे ६ मंत्री, तुरुंगात किंवा जामीनवर आहेत. तर, ३१ डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकारचे ४० घोटाळे जनतेसमोर आणणार आहे. असे म्हणत, पुढच्या काही दिवसात ठाकरे सरकारचे चार मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार असून या मंत्र्यांविरोधातील तक्रारी व कागदपत्रे तपास यंत्रणांना दिल्या असल्याचेही ते म्हणाले. यातील दोन मंत्री शिवसेनेचे, राष्ट्रवादीचा मंत्री असून विदर्भातील कॅबिनेट मंत्र्यांचादेखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटला आहे.
१२ तारखेबाबत मौन का?
१२ नोव्हेंबरला राज्यात तीन-तीन शहरात मुस्लिमांचे मोर्चे निघाले, हिंदुंना टार्गेट करण्यात आले. हे मोर्चे कोणाच्या प्रेरणेने निघाले, याबाबत ठाकरे सरकार का बोलत नाही. १२ तारखेची चौकशी का करत नाही, असे म्हणत हिंदुना घाबरवण्यासाठी असे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला.
राज्यात एकाच दिवशी तीन-तीन ठिकाणी मोठ्या संख्येने मोर्चे निघाले. अमरावतीत आंदोलनकर्त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, आणि त्याचे पडसाद उमटले. हा अत्याचार हिंदूंना घाबरवण्यासाठी करण्यात आल्याचे आरोप सोमैया यांनी केला. सोबतच, मी अमरावतीकरांना वचन दिलं होतं, त्याप्रमाणे अमरावतीत आपण आलो असल्याचेही ते म्हणाले.
एकाच दिवशी तीन ठिकाणी हजारो लोक रस्त्यावर कसे आले? १२ तारखेच्या घटनेचा तपास का करत नाही? त्या दिवशी निघालेल्या मिरवणूक या कोणाच्या प्रेरणेने निघाल्या? याची चौकशी झाली पाहिजे असे सोमैया म्हणाले. कोणी अफवा पसरवली, त्रिपुरामध्ये मस्जिद कुठे पडली याची चौकशी का केली जात नाही, याचा तपास ठाकरे सरकार का करत नाही? असाही सवाल त्यांनी उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या.
ठाकरे सरकार अजब सरकार आहे. अमरावतीमध्ये हिंदुंवर हल्ले झाले, त्यांना टार्गेट केलं गेलं. त्यासाठी मी दौरा काढला तर, मला निर्बंध घातले. ९२-९३ मध्ये झालेल्या हल्ल्यांची पुनरावृती होत आहे. हिंदुंवर जर परत असे हल्ले झाले तर त्याची जबाबदारी ठाकरे सरकारची असेल, असेही सोमैया यावेळी म्हणाले.