अमरावती : शहरात चार दिवसांपासून तणावाची स्थिती असल्याने शनिवारपासून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या १७ तारखेच्या अमरावती दौऱ्यास पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी परवानगी नाकारली आहे. परंतु, सोमैया मात्र अमरावती दौऱ्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. आपण अमरावती दौऱ्यावर जाणार असून पीडितांची भेट घेणारच असं त्यांनी सांगितलं आहे.
शहरात १२ व १३ तारखेला दोन समाजात तेढ निर्माण निर्माण होऊन सामाजिक शांततेस बाधा निर्माण झालेली आहे. शांतता व सुव्यस्थेसाठी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. शहरात जातीय तणाव वाढू नये याकरिता संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आलेले आहे. त्यामुळे बुधवारचा दौरा स्थगित करण्याचे पत्र पोलीस आयुक्तांनी सोमवारी किरीट सोमय्या यांनी दिले आहे.
अमरावतीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात आली असून या सार्वजनिक शांततेस बाधा न येण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपण अमरावती दौरा रद्द करावा असे अमरावती पोलिसांनी सोमैया यांना म्हटले आहे.
पोलिसांची नोटीस मिळताच सोमैयांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली. 'आता ठाकरे सरकारने माझ्या उद्याच्या अमरावती दौऱ्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. मला अमरावतीच्या लोकांना भेटायचे आहे' असे असे सौमैया ट्विटद्वारे म्हणाले. यासोबत त्यांनी पोलिसांची नोटीसही प्रसिद्ध केली.
अमरावतीमध्ये ज्या पद्धतीने दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला, याला ठाकरे सरकारची मूक संमती होती, असा आरोप किरीट सोमैया यांनी केला, मला अमरावतीकरांची व्यथा व स्थिती समजवून घ्यायची आहे. मात्र, पोलीस आयुक्तांनी दौऱ्यावर प्रतिबंध असल्याचे असल्याचे पत्र दिल्याचे सोमैया यांनी सांगितले. सोमैयांच्या ट्विटनंतर पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.