सामूहिक शोषखड्ड्यांतून एकत्र करणार पाणी, ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम
फोटो - ०५ आर नांदगाव खंडेश्वर
नांदगाव खंडेश्वर : ‘पाणीटंचाईयुक्त’ असा शिक्का अनेक वर्षे झेलणाऱ्या पुसनेर या गावाने ही नामुष्की दूर केल्यानंतर आता सांडपाण्यातून पसरबाग फुलविण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ एकत्र येऊन परिश्रम घेत आहेत.
योजनेसंदर्भात सरपंच मदन काजे यांनी सांगितले की, गावातील एकूण घरांची विभागणी दोन भागांमध्ये करून प्रत्येक भागासाठी दोन हजार लिटर क्षमतेची टाकी जमिनीखाली रोवण्यात आली आहे. त्यामध्ये सांडपाणी एकत्र येईल. यातील प्रत्येकी दोन हजार लिटरवर शिल्लक पाणी आऊटलेटमधून व्यायामशाळेच्या बाजूला घेतलेल्या टाक्यात शुद्ध केले जाईल. हे शुद्ध झालेले पाणी याच परिसरात तयार होत असलेल्या पसरबागेला पुरविले जाईल. सरपंच मदन काजे, माजी सचिव विक्रम पिसे, ग्रामविकास अधिकारी गिरी, स्वच्छताग्राही संदीप काजे, पुरुषोत्तम काजे, उपसरपंच प्रफुल खडसे, अमोल काजे, सतीश काजे तथा इतर लोकांच्या उपस्थितीत श्रमदानातून हे काम पूर्णत्वास गेले.
दरम्यान, एकेकाळी टंचाईग्रस्त पुसनेर गावाने विविध उपाययोजनांमधून पाण्याच्या पातळीत भर टाकली. यासाठी जलयुक्त शिवार, सीएनबी, कोल्हापुरी बंधारा दुरुस्ती तसेच वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. २०१९-२० सालात पानी फाऊंडशनच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे बक्षीस गावाने मिळविले आहे.