---------------------------
रस्त्यात उभे असलेल्या व्यक्तीवर चाकूहल्ला
अमरावती : दोन मित्र रस्त्यावर उभे राहून बोलत असताना अचानक मागून येऊन चाकूहल्ला केल्याची घटना अलीमनगरात १९ जुलै सायंकाळी ५.३० दरम्यान घडली. यात शे. एजाजोद्दीन शे. निजोमोद्दीन ऊर्फ हनुमान याच्या डोक्याला व हाताला जखम झाल्याने वैद्यकीय तपासणीअंती नागपुरी गेट पोलिसांनी आरोपी शे. राजीक शे. करीम (रा. अलीमनगर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------
दारूसाठी पैसे न दिल्याने मारहाण
अमरावती : रस्त्यात थांबवून दारू पिण्याकरिता पैशाची मागणी केली असता, नकार दिल्यावरून शिवीगाळ करून डोक्यावर दडग मारले. ही घटना रतनगंज तिसरा नागोबा ओटा येथे १९ जुलै रोजी रात्री दरम्यान घडली. ताराचंद जानराव ठाकरे (७०) यांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी जग्गू रामू ठाकरे (रा. रतनगंज) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-------------------------
क्षुल्लक कारणावरून हातोडा मारला
अमरावती : मागील महिन्यात रिपोर्ट का दिला, असे म्हणून वाद घालत महिलेच्या डोक्यावर हातोडा मारून जखमी केले. ही घटना टाकळी जहागीर येथे १९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान घडली. महिलेच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी वासुदेव दशरथ मोरे (४५) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------------
गोविंदनगरात घरफोडी, टीव्ही लंपास
अमरावती : राहुटी नसलेल्या घरात घुसून अज्ञाताने एलईडी टीव्ही लंपास केल्याची घटना गोविंदनगरात १९ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली. ओंकार गोविंदराव पैठणकर (७८, रा. चुनाभट्टी, जंगमठ) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी गुन्हा नोेंदविला आहे.
------------------
हातगाडीवर गॅसचा धोकादायक वापर
बडनेरा : आठवडी बाजार नवी वस्तीत हातगाडीवर घरगुती गॅस सिलिंडरचा धोकादायक स्थितीत वापर केल्याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. सतीश रामभाऊ बांडाबुचे (३८, रा. जुनी वस्ती) असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई १९ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता करण्यात आली.