अमरावती : भावाच्या खून प्रकरणात साक्षीदार असलेल्या एका युवकाला खून प्रकरण मागे घेण्यासाठी धमकाविले. त्यानंतर त्याच्यावर चाकूहल्ला चढविल्याची धक्कादायक घटना खोलापुरीगेट ठाण्यांतर्गत महाजनपुरा येथे बुधवारी रात्री घडली.
गंगाराम खुशालराव कायवाटे (५५), धीरज गंगाराम कायवाटे (२७,) विशाल कायवाटे (२३), विक्की कायवाटे (२१, सर्व रा. महाजनपुरा शिवाजीगेट) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी गजानन पंजाबराव पारवे (२८, रा. महाजनपुरा) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहतात. १ जानेवारी २०१४ रोजी फिर्यादी यांचा भाऊ अमोल पारवे (१९) याचा नमूद आरोपी व एक महिला मिळून खून केला होता. त्या घटनेत मृताचा भाऊ फिर्यादी हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. आरोपी धीरज याने प्रकरण आपसी घेण्यासाठी फिर्यादीला धमकावित आहे. फिर्यादी त्याच्या घरासमोर हजर असता, आरोपी धिरज व विशाल तेथे आला. केस आपसी करतो की नाही, तुझेही हाल तुझ्या भावासारखे करावे लागते काय, अशी धमकी दिली. त्यावर केस आपसी करणार नाही, असे फिर्यादीने म्हटले असता, संगनमताने फिर्यादीला चाकू मारून जखमी केले. त्याच्या मित्रालासुद्धा मारहाण केली. आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, १९५(अ), ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.