जलसंकट : वन्य प्राण्यांची पाण्यासाठी गावाकडे धावश्यामकांत पाण्डेय धारणीमेळघाटातील कोल्हापुरी बंधाऱ्यात यावर्षी थेंबभरही पाणी शिल्लक न राहिल्याने भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. तसेच नदी-नाले पूर्णपणे आटल्याने वन्यप्राणी पूर्वीच पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत असतानाचे अनेक उदाहरण आहेत. अशातच सर्व बंधारे आटल्याने पाळीव प्राण्यांनाही पाण्याची भीषण जाणवण्याची चिन्ह आहे. जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने तालुक्यात उतावली, कढाव, हरिसाल, धूळघाट, कळमखार, रोहणीखेडा, गडगा मालूर येथे कोल्हापुरी बंधारे निर्माण केले. हे बंधारे सदोष असल्याने दरवर्षी पाणी वाहून जात आहे. पूर्वीच कोट्यवधी खर्च करून आता दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रूपये कोल्हापुरी बंधाऱ्यावर उधळण्यात येत आहेत. मात्र दुखणे डोक्याला व निदान पोटाचा अशा प्रकार लघुसिंचन विभाग करीत आहे. केवळ थातूरमातूर कामे करून लाखो रूपयांची देयके अधिकारी व कंत्राटदारांच्या घशात जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकारीसुद्धा अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. दुसरीकडे गडगा, सिपना, सावरा, खंडू या नद्यांसह लहान-मोठे नाले व नद्या कोरडे पडले आहेत. सिंचनासाठी पाण्याचा सर्रास वापर केल्याने आता थेंबभर पाणीही शिल्लक राहिले नाही. त्यामुळे गावातील गुरेढोरे पाण्यासाठी इतरत्र भटकत असल्याचे चित्र आहे. परिणामी येत्या १५ दिवसांत गुरेढोरे मरण्याचा प्रकार समोर आल्यास नवल वाटायचे कारण नाही. गावाजवळील नदी-नाल्यांची अशी अवस्था असताना व्याघ्र व प्रादेशिक जंगलातील नदी-नाले तर जानेवारी महिन्यातच कोरडे पडले आहे. त्यामुळे जंगलातील अस्वल, रानडुक्कर, बिबट, गावाकडे धाव घेत आहे. त्यामुळे अनेकांवर हल्ला झाल्याचे प्रकार समोर आले आहे. जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटले असून कृत्रिम पाणवठ्यातसुद्धा पाण्याचा थेंब नाही.
मेळघाटातील कोल्हापुरी बंधारे आटले
By admin | Published: May 07, 2016 12:44 AM