अपघातप्रणव स्थळ, नियोजनाचा अभाव
बडनेरा : जुना बायपास मार्गावरील कोंडेश्वर टी पॉइंट येथे नव्याने उभारलेली चौफुली चुकीच्या नियोजनामुळे अपघातप्रवण स्थळ बनले आहे. प्रशासनाने त्यात तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांची आहे. जुना बायपास मार्गावर गतवर्षापासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याचे बरेच काम झाले आहे. निवडणुकीपूर्वी हा रस्ता राजकीय मुद्दा बनला होता. अपघात देखील वाढले होते. नव्याने तयार झालेल्या रस्त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, याच मार्गावर कोंडेश्वर टी पॉइंट या नावाने चौफुली आहे. येथून एक मार्ग अमरावती, बडनेरा, अंजनगाव बारी व कोंडेश्वरकडे जातो. अत्यंत रहदारीचा हा मार्ग आहे. सध्या कठोर संचारबंदी व महाविद्यालये बंद असल्यामुळे या मार्गावरील वर्दळ बरीच कमी झाली आहे. एमआयडीसीकडे याच चौफुलीवरून जावे लागत असून, शेकडोंच्या संख्येत वाहने येथून धावतात. चौफुलीच्या मध्यभागी मोठी जागा खोल राहिली आहे. त्यामुळे चौफुलीवरून जाणारे रस्ते अरुंद झालेत. अंजनगाव बारी मार्गाकडून येणाऱ्या वाहनचालकाला एमआयडीसीकडे जायचे असल्यास कसे जायचे, हा प्रश्न पडतो. चौफुलीच्या मध्यभागी केवळ हायमास्ट लावण्याइतकी जागा सोडल्यास रस्त्यासाठी जास्तीची जागा मिळेल व रस्ते मोठे होतील. वाहनचालकांना सहज, सरळ चौफुलीवरून मार्ग काढता येईल. चुकीच्या पद्धतीने उभारलेल्या चौफुलीचे नव्याने योग्य नियोजन करून काम करावे, असे शहरवासीयांमध्ये बोलले जात आहे. या परिसरात लाइट्स नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक वाहनचालकांना चौफुली बुचकळ्यात टाकत आहे. त्याचप्रमाणे चौफुलीच्या आजूबाजूला असलेल्या भिंतीदेखील हटविण्यात याव्या, असेही बोलो जात आहे. प्रशासनाने जीवितास धोकादायक ठरणाऱ्या या मुद्द्याचा तातडीने विचार करण्याची मागणी होत आहे.