न्यायाची हाक : ९ आॅगस्टच्या मोर्चाचेही मंथनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यासह देशाला हादरवून सोडणाऱ्या बालिकेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्याअनुषंगाने सायंकाळच्या सुमारास सकल मराठा समाजाच्यावतीने त्या पीडितेला येथील जिजाऊ पुतळयाजवळ श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. १३ जुलै २०१६ रोजी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर नराधामांनी बलात्कार करून तिची हत्या केली होती.जिजाऊ ब्रिगेडच्या मयुरा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आरटीओ कार्यालयानजीकच्या जिजाऊ पुतळ्याजवळ सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सदर बालिकेला सामूहिक श्रध्दांजली वाहण्यात आली. कोपर्डीतील घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. तरी नराधामांना शिक्षा मिळाली नाही. ही सरकारचे अपयश आहे. त्या घटनेनंतर राज्यात लाखांचे मराठा मोर्चे निघाले. लोकांच्या संतापानंतर या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर सरकारने हा खटला वर्षभरात निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापपर्यंतही या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा झालेली नाही. सकल मराठा समाजाने कायदा हातात घेण्याची प्रतीक्षा सरकारला आहे का, असा संतप्त सवाल श्रद्धांजलीच्यावेळी उपस्थित करण्यात आला. लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतरही सरकार दखल घेत नसेल तर ९ आॅगस्ट रोजी सकल मराठा समाज पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून देईल, असा हुन्कार यावेळी भरण्यात आला. मोर्चाच्या पूर्वतयारीसंदर्भातही चर्चा करण्यात आली. यावेळी बंडोपंत भुयार, संध्या पाटील, कल्पना बुरंगे, सुजाता झाडे, कीर्तीमाला चौधरी, छाया देशमुख, चंद्रकांत मोहिते, सचिन चौधरी, नितीन पवित्रकार, सीमा रोडे, आशिष टेकाडे, कल्पना वानखडे यांच्यासह शेकडो अमरावतीकरांची उपस्थिती होती. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय विद्यार्थी संघटनेच्या वतीने कॅन्डलमार्च काढून डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत पीडितेला श्रद्धांजली वाहिली.
कोपर्डीच्या पीडितेला श्रध्दांजली
By admin | Published: July 14, 2017 12:39 AM