अध्यक्ष, सीईओ, डीएचओंचा पुढाकार, शिक्षक, कर्मचाऱ्यांचा हातभार
अमरावती : गत दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग शहरापाठोपाठ ग्रामीण भागात वाढत आहे हे लक्षात घेता जिल्हा परिषदेचे शिक्षक, कर्मचारी संघटनांच्या सहकाऱ्याने व अध्यक्ष, सीईओ आणि डीएचओ यांच्या पुढाकाराने झेडपीच्या मालटेकडीसमोरील विश्रामगृहात २० खाटांचे कोविड केअर सेंटर शुक्रवार २१ मे पासून कार्यान्वित केले जाणार आहे. यासाठीची तयारी युध्दपातळीवर सुरू आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्याही वाढत आहे. अशातच रुग्णाना वेळेवर उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. अशातच कोरोना काळात रुग्णसेवेसाठी कार्यरत जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्यांनाही काेरोना संसर्गाचा सामना करावा लागला. यात अनेक कर्मचारी, शिक्षक दगावले. कोरोनाचा वाढता संसर्ग वाढती रुग्ण संख्या, वेळेवर न मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांची दखल घेत झेडपीच्या शिक्षक, कर्मचारी संघटनेने जनहितासाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी अध्यक्ष, सीईओंकडे केली होती. याकरिता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वेतनातून प्रत्येक १ हजार रुपयांची कपात करून दिली. यासोबत अन्य कर्मचारी संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे. या आर्थिक मदतीतून व जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, सीईओ अविश्यांत पंडा, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्या पुढाकाराने झेडपीच्या विश्रामगृहात २० खाटांचे कोविड केअर सेंटर कर्मचाऱ्यासह सर्वसामान्यांकरिता कार्यान्वित केले जात आहे. दोन दिवसांत सदर सेंटर सुरू होणार आहे. त्यासाठीची तयारीही अंतिम टप्यात पोहोचली आहे.
बॉक्स
अशी राहणार व्यवस्था
झेडपीच्या कोविड केअर सेंटर मध्ये १४ कक्ष आहेत. यातील १० कक्षांपैकी प्रत्येकी ५ कक्ष महिला व पुरूषांकरिता राहतील. दोन कक्ष राखीव ठेवले जाणार आहेत. दोन कक्षात आरोग्य यंत्रणेचे कामकाज चालतील. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, रुग्णांच्या मनोरंजनासाठी एलएडी स्क्रिन बसविण्यात येत आहे. एसी, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर व आरोग्याच्या सुविधा झेडपीकडून पुरविण्यात येणार आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दररोज नाष्टा व जेवण शिक्षक, कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून पुरविले जाणार आहे. याशिवाय अन्य महत्त्वाच्या सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगण्यात आले.