अमरावती :जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना अद्यापही विम्याचा लाभ मिळालेला नाही. विशेष म्हणजे शिक्षण विभागाकडे स्पष्ट मार्गदर्शन नसल्याने विभागात संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.
मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून प्रशासनाने अनेक शिक्षकांची सेवा अधिग्रहीत केली होती. ही सेवा देताना अनेक शिक्षक व त्यांचे कुटुंबीय पॉझिव्टीव्ह आले. यातील काही शिक्षकांचा मृत्यू झाला. शासनाने शिक्षकांनाही विमा कवचाची सुरक्षा प्रदान केली. त्यासाठी शिक्षकांचे प्रस्ताव पाठवावे लागत आहेत. मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या विमा कवचाचे किती प्रस्ताव अमरावती विभागातून गेले. किती शिक्षकांचा मृत्यू झाला याची अधिकृत माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयात नाही. मुळात प्रस्ताव संदर्भात शिक्षण विभागात कुठलीही स्पष्ट गाईडलाईन नसल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
प्रस्तावाबाबत गोंधळ
मृत्यू झालेल्या शिक्षकांचा प्रस्ताव ते कार्यरत असलेल्या शाळेने तयार करून कुठे पाठवावा येथूनच प्रश्न निर्माण होत आहे. काही शाळांनी शिक्षण अधिकारी कार्यालयाला प्रस्ताव पाठविले. शिक्षणाधिकारी कार्यालयात ते प्रस्ताव जिल्हाधिकारी व परस्पर मंत्रालयात पाठविले. शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात एकही प्रस्ताव नाही. मयत झालेल्या शिक्षकांचे विम्याचे प्रस्ताव नेमके कुठे व कसे पाठवावे यावर मार्गदर्शन नसल्याने संपूर्ण गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.