जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑडिट पथकाचा अहवाल, आठ रुग्णालयांकडून अतिरिक्त देयकांची रक्कम वसुलीचे निर्देश
अमरावती : कोविड रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांनी अव्वाच्या सव्वा देयके आकारली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑडिट पथकाने अहवाल सादर केला असून, शहरातील आठ रुग्णालयांकडृून १ कोटी ३० लाख रुपये रुग्णांना परत मिळणार आहेत. येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकारी या निर्णयावर शिक्कामोर्तब करतील, हे विशेष.
गतवर्षी मार्च ते सप्टेंबर दरम्यान शहरातील आठ खासगी कोविड रुग्णालयात अव्वाच्या सव्वा देयके आकारल्याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे प्राप्त झाली होती. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली पथक गठित केले होते. या पथकाने अमरावती शहरातील आठ खासगी काेविड हाॅस्पिटलची झाडाझडती घेतली. रुग्णांना आकारण्यात आलेली देयके आणि शासनाने निश्चित केलेले दर यात मोठी तफावत या पथकाला आढळून आली. त्यामुळे कोणत्या रुग्णांकडून अतिरिक्त वैद्यकीय देयके वसूल करण्यात आली, याची यादी तयार करण्यात आली आहे. आठ खासगी कोविड रुग्णालयांकडून १ कोटी ३० लाख वसूल करून ते रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाइकांना परत केले जाणार आहेत. विभागीय आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते रुग्णांना ही रक्कम परत मिळेल, अशी माहिती आहे.
----------------
खासगी कोविड रुग्णालयात अतिरिक्त देयके घेतल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी नेमली होती. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून, येत्या दोन दिवसांत कारवाईची दिशा निश्चित केली जाईल. संबंधित रुग्णालयांकडून ती रक्कम वसूल केली जाणार आहे.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती.