६४२० विद्यार्थ्यांवर अन्याय, कृषी विद्यापीठाला टाळे लावण्याचा भाजयुमोने दिला इशारा
अमरावती : कृषिक्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी धडपडणाऱ्या कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या सहा हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणात राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषद आणि राज्य शासनाने खोडा घातला आहे. तीन वर्षीय अभ्यासक्रमात उत्तीर्ण राज्यभरातील ६४२० विद्यार्थ्यांना यावर्षी कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश नाकारण्यात आला आहे.
राज्यातील चार कृषी विद्यापीठांशी संलग्न कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या सन २०१८-२१ च्या विद्यार्थ्यांना कृषी पदवी शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षासाठी थेट प्रवेश नाकारण्यात आला. या विद्यार्थ्यांनी दहावीनंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. त्यांंना पदवी परीक्षेसाठी आता पुन्हा अकरावीला प्रवेश घेण्याची वेळ राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषद आणि राज्य शासनाने आणली आहे. त्यापूर्वी सन २०१७-२० या शैक्षणिक सत्रात उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी कृषी पदवी शिक्षणाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतला आहे. काही तंत्रनिकेतननी विद्यार्थ्यांना प्रवेश पुस्तिका दिल्याच नाही व त्यांना भ्रमात ठेवून प्रवेश करून घेतले.
कृषी तंत्रनिकेतनची पदविका उत्तीर्ण केल्यानंतर कृषि पदवीच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश मिळत असल्यामुळे दहावीनंतर विद्यार्थी प्रवेश घेतात. परंतु, आता या विद्यार्थ्यांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. राज्यात चारही कृषी विद्यापीठांतील १०७ कृषी तंत्रनिकेतनमधील ६४२० विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या विषयात कृषी विद्यापीठांना लावण्याचा इशारा भाजयुमोने दिला आहे.
०००००००००००००
प्रवेश माहिती पुस्तकात जरी पदवीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश नाकारल्याची माहिती असली तरी हे प्रवेश माहिती पुस्तक विद्यार्थ्यापर्यंत पोहचले नाही. हा प्रकार विद्यार्थ्यांचे खिसे खाली करण्यासाठी आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.
- सोपान कनेरकर, प्रदेश सचिव, भाजयुमो.
००००००००००००००००००००
कृषी तंत्रनिकेतनची ही शेवटची बॅच होती. यासंदर्भात धोरणात्मक निर्णय झाला असल्याने पदवी प्रवेशाबाबत अगोदरच निर्णय झाला आहे. कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय करण्याचा प्रश्नच नाही.
- विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.