जागोजागी खड्डे :
धारणी : मध्यप्रदेशात जाणाऱ्या अमरावती बुरहाणपूर मुख्य मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य तथा माजी महिला व बालकल्याण सभापती वनिता पाल यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे या रस्त्याबाबत तक्रार केली आहे.
रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे अनेक वेळा गंभीर प्रकारचे अपघात होऊन लोकांना जखमी व्हावे लागले आहेत. मुख्य म्हणजे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. मध्य प्रदेशातील बुरहाणपूर, खंडवा व इंदूरकडे जाणारी तसेच परतवाडा, अमरावती व नागपूरकडे जाणारा हा मुख्य मार्ग सध्या आपल्या दुर्दशेवर अश्रू ढाळत आहे. कुसूमकोट ते भोकरबर्डीपर्यंतचा १० किलोमीटर रस्त्याची तर अक्षरश: चाळणी झालेली आहे. काही प्रमाणात डागडुजी केलेला रस्ता पुन्हा खड्डेयुक्त झाला आहे. या रस्त्यांची तात्काळ सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी वनिता पाल यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. त्याची प्रतिलिपी राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार राजकुमार पटेल, सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता अचलपूर, उपविभागीय अभियंता धारणी यांच्याकडे दिली आहे.