अमरावती : शहर गुन्हे शाखा, पोलीस आयुक्तांचे विशेष पथक आणि अन्न व औषध विभागाने मंगळवारी रात्री कारवाई करून अमरावती शहरात रेमडेसिविरच्या काळाबाजाराचा पर्दाफाश केला. आरोग्य विभागाच्या एचआयव्ही कार्यक्रमात कार्यरत व सध्या संजीवनी कोविड हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत अनिल गजानन पिंजरकर (३८) हा या प्रकरणाचा मास्टर माईंड असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.
अनिल पिंजरकर हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याला तातपुरत्या कारागृहात उपचाराकरीता ठेवले आहे. कोविड रुग्णालय, पीडीएमसी व खासगी हॉस्पिटलमधील वार्डबॉय सदर आरोपीकडून रेमडेसिविर घेत होते, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. सदर आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तपासाला विलंब होत असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. याप्रकरणी दोन डॉक्टरांसह तीन वाॅर्डबॉय, एक नर्स व एक टेक्निशियन अशा एकूण सात आरोपींना पोलिसानी अटक केली. सहा जणांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली आहे. सर्व आरोपींनी आठवडाभरापूर्वीच हा व्यवसाय सुरू केला होता. तिवसा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक असलेला डॉक्टर पवन दत्तात्रय मालुसरे हा डॉक्टर असल्याने त्याच्याकडे त्याच्याकडे सतत चार ते पाच रेमडेसिविहर राहत असे. मात्र, त्याने या औषधसाठ्याचा गैरवापर केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर करीत आहेत.