अपुरे कमिशन, अधुऱ्या सोयी : दोन दिवसांपासून काम बंदबडनेरा : बडनेऱ्यातील मंगलम् भारत गॅस वितरण कंपनीत ग्राहकांना सिलिंडर वाटपाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन छेडले. १३ वर्षांपासून आम्हाला तोकड्या कमीशनवर काम करावे लागत असल्याची व्यथा या प्रमुख मागणीत आहे. वितरक व कर्मचाऱ्यांच्या वादात मात्र ग्राहक नाहक भरडला जात असल्याचे ग्राहकांमध्ये बोलले जात आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी बडनेरा पोलिसांसह संबंधितांकडे तक्रार दिली आहे.मंगलम् गॅस वितरकामार्फत ग्राहकांना सिलिंडर वितरित करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून काम बंद केले आहे. त्यांनी एजंसीचे मालक तसेच संबंधित विभागांना त्यांच्या मागणीचे निवेदन लेखी स्वरुपात दिले आहे. बडनेऱ्यात सन २००२ मध्ये भारत गॅस कंपनीने मंगलम् गॅस नावाने एजंसी दिली आहे. तेव्हापासून आम्ही या वितरकाकडे ग्राहकांना सिलिंडर वाटपाचे काम करीत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. भविष्य निर्वाह निधी देण्यात यावा, वर्षभऱ्यात सिलिंडर वाटप करताना रिक्षांच्या दुरूस्तीमागील खर्च नियमित देण्यात यावा, दुखापत झाल्यास उपचाराची जबाबदारी घ्यावी, वर्षभरात दोन ड्रेस द्यावे, बोनस मिळावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन या कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागाकडे दिले आहे. निवेदनात बाबू कुमरे, सूरज घरडे, राजू बहाडे, गजानन बाजड, मनोज जाधव, गुणवंत हिरोडे, विकास शेळके, श्रीकृष्ण हिरोडे, नितीन घरडे, श्याम श्रृंगारे, गजानन रोहणकर, दिलीप चिमणे, विजय नेवारे यांचा समावेश आहे. वितरक व गॅस सिलिंडर वितरित करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वादात मात्र ग्राहकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत असल्याची ओरड ग्राहकांमध्ये होत आहे. (शहर प्रतिनिधी)ग्राहकांना वेठीस धरणे योग्य नाही. चर्चेसाठी त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. चर्चेअंती निर्णय घेता येईल. ग्राहकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. - योगेश झंवर, संचालक. वाजवी मागण्या वितरकांकडे आम्ही रेटत आहोत. मात्र मागण्यांना केराची टोपली दाखविली जाते. मागणीचा विचार होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, ग्राहकांना वेठीस धरण्याचा आमचा हेतू नाही. - सूरज घरडे, सिलिंडर वितरक.
बडनेरातील गॅस कंपनीविरुद्ध कामगारांचा एल्गार !
By admin | Published: December 04, 2015 12:26 AM