अप्पर वर्धा प्रकल्पस्थळी नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर
मोर्शी : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण व पर्यटन स्थळ म्हणून गणल्या जाणाऱ्या अप्पर वर्धा धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. अगदी धरणाच्या प्रवेशद्वारापासून ते संपूर्ण परिसरात बाराही महिने सुरक्षारक्षक, पाटबंधारे विभागाचे किंवा पोलीस प्रशासनाचे कर्मचारी नजरेस पडत नाहीत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे नजरेस पडत नसल्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरण हे सन १९९३ साली पूर्णत्वास गेले असून, या धरणात ६७८.२७ दलघमी पाणी साठवणुकीची क्षमता आहे. अमरावती शहर तसेच मोर्शी, वरूड, नांदगाव पेठ, बडनेरा या गावांना व बडनेरा रेल्वे स्टेशनला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. हिवरखेड व ११ खेडे, लोणी व १४ खेडे, मोर्शी तालुक्यातील ७० गाव पाणीपुरवठा योजना, आष्टी, पेठ अहमदपूर व पांढुर्ण्याला पाणीपुरवठा ७७.३२९ दलघमी याव्यतिरिक्त अमरावती, नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीकरिता २४.७३५ दलघमी व सोफिया औष्णिक प्रकल्पाकरिता १२३.५२ दलघमी आरक्षित आहे. या धरणावर १ लक्ष ४ हजार ४०४ हेक्टर सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. कालव्यांच्या माध्यमातून ८३ हजार ३०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. अशा या समृद्ध प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रावर नेहमीच प्रेमीयुगुलांचा बिनधास्त वावर असतो. दररोज शेकडो पर्यटक प्रतिबंधित क्षेत्रात चक्क धरणात उतरून आपला जीव धोक्यात घालून फोटोसेशन करताना पाहायला मिळतात. वास्तविक या परिसरात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. एवढेच नाही तर दारूच्या पार्ट्यासुद्धा धरण परिसरात रंगत असतात. अप्पर वर्धा धरणाच्या भिंतीवर प्रकाश व्यवस्था नाही. भिंतीवरील गेटसुद्धा नेहमी खुले असतात. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील गार्डन परिसर नेस्तनाबूत झाले आहे.