लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बुधवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे. अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई कन्या शाळेतील तन्वी वानखडे, देवयानी मोपारी आणि प्रणोती धारस्कर या विद्यार्थिनींनी १०० टक्के गुण मिळवित एकाच शाळेतून जिल्ह्यातील ‘टॉप थ्री’चा बहुमान पटकाविला.अमरावती येथील सामरा इंग्लिश हायस्कूलची दिशा डागा हिने १०० टक्के गुण मिळवित जिल्ह्यातून चौथी, तर ज्ञानमाता हायस्कूलचा अंशुल दीपक धोटे याने ९९.६० टक्के गुण पटकावित पाचव्या क्रमांकाचा बहुमान पटकाविला. जिल्ह्यात १९ हजार ७७३ मुलींपैकी १८ हजार ९९२ मुली उत्तीर्ण झाल्या, तर २१ हजार २७२ पैकी १९ हजार ५२९ मुले उत्तीर्ण झाले आहेत.शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर केला. यात अमरावती जिल्ह्याचा निकाल ९३.९४ टक्के लागला असून, मागील वर्षी तो ७१.९८ टक्के इतका होता. यावर्षी निकालात २३.१६ टक्क््यांची घसघशीत वाढ झाली आहे.समर्थ हायस्कूलची श्रुती मुदगल हिने ९९.४० टक्के गुण, होलिक्रॉस इंग्लिश हायस्कूलमधून तनया साधवानी व आर्या अळसपुरे या दोन्ही विद्यार्थिनींनी ९५.६० टक्के गुण, अरुणोदय शाळेतून मथुरा कानफडे हिने ९४ टक्के गुण, जिल्हा परिषद कन्या शाळेतून पलक वानखडे हिने ९४.८० टक्के गुण, न्यू गोल्डन इंग्लिश स्कूलच्या उन्नती वाघ हिने ९७ टक्के गुण, गोल्डन किड्समधून अमितेश आगरकर याने ९७.८० टक्के गुण, धारणी येथील किडस केअर स्कूलमधून निकिता कातखेडे हिने ९८.२० टक्के गुण, बडनेरा येथील राजेश्वर युनियन हायस्कूलची वैष्णवी इंगाले हिने ९६.४० टक्के गुण, मणिबाई गुजराती शाळेची आचल देशमुख हिने ९७.८० टक्के गुण, चांदूर बाजार येथील जी.आर. काबरा विद्यालयाची सावी मोहोड हिने ९७.६० टक्के गुण, मोर्शी येथील शिवाजी उच्च माध्यमिक शाळेतील शर्वरी सोनुकले हिने ९८.४० टक्के गुण, धामणगाव रेल्वे येथील सेफला हायस्कूलमधील श्रेयस घुगे याने ९९.८० टक्के गुण, अंजनगाव सुर्जी येथील कृष्णाबाई दंडाळे इंग्लिश हायस्कूलची राधा श्रीकांत आंवडकर हिने ९६.८० टक्के गुण, अमरावतीच्या साहिल माध्यमिक शाळेतून आरती ठाकरे हिने ९० टक्के व होलिक्रॉस मराठी हायस्कूलची श्रेया राजेंद्र खडेकार हिने १०० टक्के गुण मिळविले. हे सर्व विद्यार्थी शाळेतून अव्वल आले आहेत.देवयानीला डॉक्टर बनायचंयअंजनगाव सुर्जी : सीताबाई संगई कन्या शाळेच्या देवयानी मोपारी हिने जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकावला. दहावीच्या परीक्षेत तिला एकूण ५०० गुण मिळाले असून, विषयांमधील ४९४ तसेच सहा गुण क्रीडा/कलेचे आहेत. रोज पहाटे उठून अभ्यास हा नित्यक्रम चुकू न दिल्याने यशाचे शिखर गाठता आल्याचे देवयानी म्हणाली. देवयानीचे वडील राहुल मोपारी हे संगई माध्यमिक विद्यालयात, तर आई सोनगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. लहान भाऊ अर्णव पाचवीचा विद्यार्थी आहे. सध्या ‘नीट’ची तयारी करीत असलेल्या देवयानीला डॉक्टर बनायचे आहे. संपूर्ण वर्षभर मोबाईलपासून दूर राहणारी देवयानी आता कुठे आॅनलाईनसाठी मोबाईल हाताळत आहे.प्रणोती वैद्यकीय क्षेत्रात जाणारअंजनगाव सुर्जी : दहावीतील ‘टॉप थ्री’ मेरिट देण्याचा बहुमान सीताबाई संगई कन्या शाळेने पटकावला. तन्वी, देवयानी पाठोपाठ याच शाळेच्या प्रणोती धारस्कर हिने जिल्ह्यातून तिसरे स्थान पटकावले. संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या प्रणोतीला विषयांमध्ये ४९२, तर क्रीडा/कलामधून आठ गुण आहेत. तिचे वडील गजानन धारस्कर हे एलआयसीचे अधिकारी, तर आई गृहिणी आहे. मोठा भाऊ वैष्णदीप हा बारावीला आहे. निव्वळ पाठांतरावर भर न देतास, प्रत्येक धडा वाचून, लिहून काढण्याच्या सवयीने दहावीत यश मिळवून दिले, असे प्रणोती म्हणाली. संगीताचा कान असलेल्या प्रणोतीला हार्मोनियम उत्तम येतो. तिला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचे आहे.
अंजनगाव सुर्जी येथील लेकी ‘टॉप थ्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 5:00 AM
बुधवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे. अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई कन्या शाळेतील तन्वी वानखडे, देवयानी मोपारी आणि प्रणोती धारस्कर या विद्यार्थिनींनी १०० टक्के गुण मिळवित एकाच शाळेतून जिल्ह्यातील ‘टॉप थ्री’चा बहुमान पटकाविला.
ठळक मुद्देनिकाल ९३.९४ टक्के; यंदा २३.१६ टक्क्यांनी वाढ : तन्वी वानखडे- प्रथम, देवयानी मोपारी- द्वितीय तर प्रणोती धारस्कर तृतीय