वनोजा बाग : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गरजदरी धरणाला अवैध उत्खनन करणाऱ्यांचे ग्रहण लागले असून महसूल विभाग, जलसंपदा विभाग याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याची चर्चा आहे. अंजनगाव सुर्जी येथून जवळच असलेल्या, परंतु चिखलदरा महसूल विभागाचा भाग असलेल्या गरजदरी येथे निसर्गाने आपल्या सौदर्याची लयलूट केली आहे. गरजदरी येथे पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेले धरण आहे. धरणाला लागून वस्ती आहे. या धरणाला लागूनच अंजनगाव सुर्जी येथील काही धनदांडग्यांची शेती आहे. शेत हे नावालाच असून शेतात असलेले मुरुमाचे पहाड त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. धरणाला लागुन असलेल्या शेतात काही महिन्यांपूर्वी एक-दोन मोठे पहाड होते. आज ते तेथून गायब झाले आहेत. दररोज या ठिकाणहून अवैध मुरुम उत्खननाचे ट्रक अंजनगाव सुर्जी येथून विशेषत: तहसील कार्यालयासमोरून भरून जातात. परंतु, आजपर्यंत ही या ट्रकवर कुठलीच कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. पाटबंधारे विभागालाही धरणाच्या बाजूने अवैध उत्खनन होत असताना कारवाई करणे अपेक्षित वाटले नाही. त्यामुळे या अवैध उत्खननात सर्वांचेच हात ‘ओले’ झाल्यांचा संशय व्यक्त केला जात आहे. हा भाग जरी चिखलदरा तालुक्यात येत असला तरी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नागरिकांची धरणावर ये-जा असते. जर अशाप्रकारे निसर्गाने उधळण केलेल्या भागाचे सौंदर्य नष्ट केले जात असेल आणि या अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई होत नसेल, तर निसर्गप्रेमींनी दाद कुणाकडे मागावी, हा प्रश्न निर्माण होत आहे.
गरजदरी येथे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:10 AM