निवडणूक : अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवसअमरावती : जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगरसेवक पदाच्या एकूण १९८ जागांसाठी १ हजार १४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तर नगराध्यक्षपदाच्या ९ जागांकरिता ९४ उमेदवारी अर्ज आले होते. आता ११ नोव्हेंबर रोजी नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक ठिकाणी माघारीसाठी मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शुक्रवारी सांयकाळी उशिरापर्यंत निवडणूक रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.जिल्ह्यातील अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, शेंदुरजना घाट, चांदूररेल्वे, धामणगांव रेल्वे या नऊ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्यामुळे यापालिकांच्या क्षेत्रात राजकीय वातावरण तापत आहे. नऊ नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी १९८ जागांवर उमेदवार निवडून द्यायचे आहेत. विशेष म्हणजे ंयंदा पालिका निवडणुकीत नगराध्यक्षाची निवड ही थेट जनतेतून होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यात प्रमुख राजकीय पक्षासह इतर पक्ष व स्थानिक आघाड्यांचा समावेश आहे. यासोबतच नगरसेवकपदासाठी अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक रिंगणात उमेदवार उभे केले आहेत. सद्यस्थितीत नगराध्यक्षपदासाठी ९४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. तर नगरसेवकपदासाठी १ हजार १४१ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. मात्र, आता निवडणुकीतून माघार घेण्यासाठी शेवटचा दिवस उजाडल्याने नगरपालिकांमध्ये बंडोबांची मनधरणी केली जात आहे. एकंदर निवडणुकीसाठी नामांकन दाखल केलेल्या उमेदवारांपैकी कितीजण माघार घेतात, याकडे संपूर्ण राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. उद्या या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरच खऱ्या अर्थाने विविध राजकीय पक्ष आराखडेही मांडतील व प्रचाराला गती येईल. निवडणुकीची रणधुमाळीच खऱ्या अर्थाने शुक्रवारी उमेदवारांच्या माघारीनंतर स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)
नऊ पालिकांचे अंतिम चित्र आज होणार स्पष्ट
By admin | Published: November 11, 2016 12:27 AM