जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ‘खो’, एक्साईज, पोलिसांचे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’
अमरावती : राज्य शासनाने कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता ३० जानेवारीपर्यंत ‘लॉकडाऊन’ वाढविला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहे. मात्र, शहरासह ग्रामीण भागातील वाईन शॉप, बियर बारमध्ये रात्री उशिरापर्यंत ‘चिअर्स’ सुरू असून, येथे होणारी गर्दी कोरोनाचा स्फोट करणारी ठरेल, असे चित्र आहे. बियर बारचे शटर बंद चोरट्या मार्गाने प्रवेश आतमध्ये मद्यपान, असे सरार्स सुरू आहे. तरीही एक्साईज, पोलिसांचे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा कारभार सुरू आहे.
लस आली तरी कोरोना गेला नाही, असे प्रशासन वारंवार सांगत आहे. काेरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील वाईन शॉप रात्री १० पर्यंत, तर बियर बारला रात्री ११ वाजतापर्यंत परवानगी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहे. परंतु, वाईन शॉप, बियर बारमध्ये रात्री ९ वाजतानंतरच गर्दी जमायला सुरुवात होते. काही बियर बारमध्ये रात्री उशिरापर्यंत टेबल बुकींग करून ठेवले जातात. अशात टेबल मिळवण्यासाठी बियर बारमध्ये चोरट्या मार्गाचा अवलंब होत आहे. अमरावती ते बडनेरा मार्ग, पंचवटी ते रहाटगाव मार्गावर बियर बारच्या बाहेरील भागात उशिरा रात्री १२ ते १ वाजतादरम्यान वाहनांच्या रांगा या नित्याच्याच झाल्या आहेत. बाहेरून शटर बंद ठेवून आत सर्व सोईसुविधा पुरविल्या जातात. अनेक जण शहराबाहेर एकांत शोधण्यासाठी हाॅटेल, बियर बारमध्ये जातात.
मद्य प्राशन करून वाहन घरापर्यंत नेतात. यादरम्यान अनेकांचे अपघात झाल्यांच्या घटना घडल्या आहेत. या बाबीला राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील उशिरा रात्रीपर्यंत चालणारे मद्यालये जबाबदार आहे. यात हॉटेल, ढाबे आणि बियर बारचा समावेश असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमधून पुढे आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी का होत नाही, याचा शोध प्रशासनाने घेतल्यास बरेच तथ्य
बाहेर येईल, हे वास्तव आहे.
--------------------
बाहेरून बंद तरीही वाहनांच्या रांगा
बडनेरा, रहाटगाव, वलगाव, जुने बायपासवरील हाॅटेल, बियर बारचे बाहेरून शटर बंद असते. परंतु, रात्री १२ किंवा १ वाजतापर्यंत रस्त्यालगत वाहनांच्या रांगा कशासाठी याचा शोध पोलीस कधी घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
----------------
शासकीय कर्मचाऱ्यांची गर्दी
जिल्हा कचेरीच्या मागील बाजुस आणि रेल्वे स्थानक मार्गावरील हॉटेल, बियर बार हे रात्री उशिरापर्यंत चालतात. येथे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचीच गर्दी दिसून येते. त्यामुळे कारवाईची भीती नाहीच.
-------------
‘ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह’नियमित का नाही.?
पोलिसांची मोहीम असली तरच ‘ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह’ची कारवाई केली जाते. त्यामुळे इतर दिवसही मोहीम राबवून मद्यावस्थेत सुसाट वाहने चालविणाऱ्यांना आवर घालता येईल.
--------------------
अपघाताच्या घटना वाढल्या
राज्य, राष्ट्रीय महामार्गावर उशिरापर्यंत चालणारे हॉटेल, ढाबे रात्री उशिरापर्यंत चालतात. येथेच्छ मद्यपान केल्यानंतर झिंगलेल्या अवस्थेत अनेक जण सुसाट वेगाने वाहन चालवितात. अशातच अपघाताच्या घटना वाढल्या आहेत.
--------------
जिल्हाधिकार्यांचे आदेश काय?
१) वाईन शॉप अथवा दारू विक्री करणाऱ्यांना दुकानांना रात्री १० वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश आहे. मात्र, शहरातील वाईन शॉप, दारू विक्रीचे दुकाने रात्री १०.३० तर काही ११ वाजतापर्यत सुरू असतात. बाहेरून बंद
आतून दारूची डिलेव्हरी, असे चित्र आहे.
२) बियर बार व मद्य विक्री हॉटेलला रात्री ११ वाजतापर्यंत परवानगी आहे. प्रत्यक्षात रात्री ११ वाजतानंतरच येथे गर्दी होते. ही गर्दी पहाटेपर्यंत असते.
-----------------------------
‘लेट नाईट’ बियर बार अथवा वाईन शॉप हे जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे एक्साईज निरीक्षकांना त्यांच्या भागातील अशा आस्थापनांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. तसेही
फिरत्या पथकाद्धारा अनेक ठिकाणी कारवाईचे सत्र सुरु असते.
- स्नेहा सराफ, प्रभारी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अमरावती