वनपालांमध्ये धास्ती : आरागिरणी संचालकांची पुढाऱ्यांकडे धावअमरावती : लाकूडतोड परवानगी पासेस तपासणीला प्रारंभ करण्यात आला असून जिल्हाभरातील वनपालांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. तसेच हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसून येताच आरागिरणी संचालकांनी राजकीय पुढाऱ्यांकडे धाव घेतल्याची माहिती आहे.गत महिन्यात वलगाव मार्गावर नेहा वूड, वाह ताज या आरागिरणीवर धाडसत्र राबवून नियमबाह्य लाकूड ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान नेहा वूडमधून ताब्यात घेण्यात आलेल्या लाकडांची तपासणी करण्यासाठी १३ नमुने देहरादून येथे प्रयोगशाळेत पाठविले आहे. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या लाकडाची परवानगी पासेस तपासले असता बरेच गौडबंगाल असल्याचे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हाभरातील आरागिरण्यांची तपासणी करून लाकूडतोड परवानगी पासेस कोठून, कशा? मिळविल्यात ही शोधमोहीम सुरू करण्याचा निर्णय वनसंरक्षक राजेंद्र बोंडे यांनी घेतला होता. त्यानुसार वन परिक्षेत्राधिकाऱ्यांना पासेस तपासणीचे कळविले आहे. पहिल्या टप्प्यात लाकूडतोड परवानगी पासेस देण्याची जबाबदारी वनपालांकडे सोपविण्यात आल्यामुळे वनपालांनी लाकूडतोड करावयास दिलेली परवानगी वैध की, अवैध? हे शोधून काढले जात आहे. लाकूतोड परवानगी पासेसमध्ये अनेक वनपालांवर कारवाई टांगती तलवार असल्यामुळे ही साखळी आरागिरणी संचालकांपर्यंत पोहचेल यात शंका नाही. त्यामुळे लाकूडतोड परवानगी पासेस तपासणी प्रारंभ होण्यापूर्वीच काही आरागिरणी संचालकांनी थेट आमदारांकडे धाव घेतल्याची माहिती आहे. लाकूडतोड परवानगी पासेस तपासणीचे कार्य पूर्ण होताच अहवालात पडताळून बघितला तर अनेक वनपालांच्या ‘विकेट’ पडल्याशिवाय राहणार नाही, हे वास्तव आहे. वनविभागात काही अधिकाऱ्यांचे आरागिरणीच्या मालकांसोबत मधुर संबंध असल्याचे सर्वश्रृत चर्चा आहे. हल्ली आडजात वृक्ष कापण्यास परवानगी नसताना शहरात राजरोसपणे लाकडाने लादलेली वाहने आणली जात आहे. परिणामी आरागिरणींवर धाडसत्र राबविल्यानंतर बरीच सत्यता वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याशिवाय राहणार नाही, हे उल्लेखनीय. (प्रतिनिधी)
लाकूडतोड परवानगी पासेस तपासणीला प्रारंभ
By admin | Published: April 16, 2016 12:12 AM