अमरावती : मौजा तारखेडा येथील शासकीय जागेवर ले-आऊटला तांत्रिक मंजुरात दिल्याबाबतच्या प्रकरणाची पूर्ण तपासणी करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त प्रशांत रोडे यांनी गुरुवारच्या आमसभेत दिले. या प्रकरणात सहायक संचालक नगररचना विभागाच्या (एडीटीपी) कारभारावर सभागृहात चांगलीच आगपाखड करण्यात आली.
प्रशोत्तराच्या तासांत सदस्य राजेश साहू यांनी याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली. मौजा तारखेडा येथील शीट क्रमांक ५१/२ च्या शासकीय मोजणी शीटवर किती जागा दाखविण्यात आलेली आहे, यावर कोणाचा ताबा दाखविण्यात आलेला आहे व या जागेवर ले-आऊटला परवानगी दिली आहे काय तसेच या जागेवर वॉल कंपाऊंडचे बांधकाम आहे काय, अशी विचारणा केली. या जागेवर सात-बारावर वेगळे व मोजणी शीटवर महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ असे नाव असल्याचा पुरावा त्यांनी सभागृहात सादर केला. या जागेवर १२ एप्रिल २०२१ रोजी ले-आऊटला तांत्रिक मंजुरी देण्यात आल्याचे एडीटीपी आशिष उईके यांनी सभागृहाला सांगितले. या प्रकरणात सर्व कागदपत्रे चुकीची लावण्यात आल्याची शंका सदस्य विलास इंगोले यांनी व्यक्त करीत संबंधिताला नोटीस बजावून बोलाविण्याची सूचना केली. यावर पुढच्या आमसभेत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापती चेतन गावंडे यांनी दिले.
बॉक्स
नवाथे मल्टिप्लेक्स पीएमसीबाबत नोंदविल्या हरकती
यापूर्वीच्या सभेत गोंधळ झालेल्या नवाथे मल्टिप्लेक्ससाठी पीएमसी नेमण्यासाठीचे कार्यवृत्तांत कायम करण्यामध्ये अनेक सदस्यांनी हरकती नोंदविल्या. विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून ऑनलाईन सभेत नियमबाह्य विषय मंजूर करू शकत नाही, आम्ही यावर मतदान मागितले असल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी आयुक्तांना पत्र देऊन हरकतीचे सहा मुद्दे उपस्थित केले असल्याचे ते म्हणाले.
बॉक्स
गुणदान पद्धती सभागृहासमोर केव्हा?
पीएमसीच्या गुणदान पद्धतीसोबतच अटी व शर्ती सभागृहासमोर आल्या नसल्याचे सदस्य प्रकाश बनसोड म्हणाले. याविषयी मागच्या सभेत याबाबत नियमबाह्य प्रकार झाला. हे रोखण्याची जबाबदारी आयुक्तांची असल्याचे बबलू शेखावत म्हणाले. विरोधी पक्षनेत्याच्या पत्राला प्रशासनाने उत्तर द्यावे व हरकती नोंदवाव्यात, अशी सूचना सदस्य मिलिंद चिमोटे यांनी केली.