अमरावती : शिकाऊ वाहन चालक परवाना काढण्यासाठी आॅनलाईन चाचणीसाठी वेळ घेत आहात आणि दीड महिन्यापर्यंत वाट पाहत बसावे लागते तर आता मात्र यावर प्रादेशिक परिवहन विभागाने तोडगा काढला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडे मागील दीड महिन्यापासून आॅनलाईन परवान्यासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या परिवहन कार्यालयांनी गरज पडल्यास शासकीय सुट्याच्या दिवशीही कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबत चाचणी परीक्षेसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वेळ वाढविण्याचा सल्लाही दिला आहे. या संदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाने अहवालसुद्धा मागितला आहे. जिल्ह्यासह राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये शिकाऊ व पक्का परवान्यासाठी आॅनलाईन चाचणी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. याबाबत सध्या आढावा घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी काही सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाकडे चाचणीच्या वेळेसाठी मोठी प्रतिक्षा यादी आहे यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे ही बाब लक्षात घेता काही अनधिकृत घटनांना चालना मिळू नये यासाठी परिवहन विभागाने काही महत्त्वाच्या सूचना देऊन या सूचनेनुसार दीड महिन्यापेक्षा जास्त प्रतीक्षा यादी असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात चाचणीची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत केली जाण्याची शक्यता आहे. तसेच शनिवार, रविवार व इतर शासकीय सुट्याच्या दिवशीही शक्य त्या प्रमाणे चाचणी यंत्रणा सूचना देण्यात आली आहे. शिवाय या उपाययोजनेनंतर दरदिवसाला दिल्या जाणाऱ्या परवान्याच्या कोट्यातही वाढ करण्याचे निर्देश प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे रखडलेली प्रतीक्षा यादी निकाली निघणार असल्याने समस्या सुटण्याची चिन्हे आहेत. याबाबत आनंदाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
शिकाऊ परवाना प्रतीक्षा यादी निकाली काढणार व्यवस्था : सुट्यांच्या दिवशीही होणार चाचणी
By admin | Published: March 29, 2015 12:31 AM