अमरावती : अमरावती पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण बुधवारपासून १३ डिसेंबरपासून येथील पोदार व ईडीफाय इंग्लिश स्कूलमध्ये तालुक्यातील १५० शिक्षक अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापनाचे धडे गिरवित आहेत. या शिक्षकांना नऊ सुलभक प्रशिक्षण देत आहे.
मुलांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी केवळ वर्गात शिकवणे एवढीच कृती पुरेशी ठरणार नाही. त्यासाठी अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करण्याची गरज आहे. याकरिता शिक्षण विभागातर्फे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे तालुकास्तरीय प्रशिक्षण सुरू आहे. स्टार प्रोजेक्ट्स अंतर्गत शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली डायटच्या यांच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण दिले जात आहे. मुलांना एकतर्फी शिकवण्यापेक्षा ती स्वतःहून शिकतील, त्यांच्यामध्ये जिज्ञासूवृत्ती विकसित होईल. आव्हाने पेलण्यास, स्वीकारण्यास विद्यार्थी सक्षम बनतील व स्वतःहून शिकण्यास प्रेरित होतील, यादृष्टीने शिक्षकांनी नियोजन व व्यवस्थापन कसे करावे, यानुसार या प्रशिक्षणाची रचना केलेली आहे.
यामध्ये व्हिडिओ पाहून त्यावर चिंतन व आपले विचार स्वाध्यायाच्या स्वरूपात लिहिणे, हा या प्रशिक्षणाचा आत्मा आहे. सदर प्रशिक्षण तालुकास्तरावर देण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व शाळा व सर्व शिक्षकांपर्यंत आणि त्यानंतर शिक्षकांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे आणि विद्यार्थी गुणवत्तावाढीसोबतच आपल्या विद्यार्थ्यांना सुजाण, जबाबदार नागरिक बनवणे व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवणे, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. नऊ सुलभक अमरावती पंचायत समितीतील सुमारे १५० शिक्षकांना या प्रशिक्षणात मार्गदर्शन करीत आहे. या प्रशिक्षणासाठी गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुलभक म्हणून सुभाष सहारे, नलिनी बाबरे, जयश्री गुल्हाणे, वैशाली पाचकवडे, स्वप्नाली ठाकरे, नंदकुमार झाकर्डे, वंदना अघमकर, सुषमा पाटील काम पाहत आहेत.