राजकीय वर्तुळाचे लक्ष : झेडपी, पंसच्या गट-गणांच्या आरक्षणाची घोषणा अमरावती : फेब्रुवारी-मार्च २०१७ महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी गट आणि गणांची आरक्षण सोडत बुधवार ५ आॅक्टोेबर रोजी काढली जाणार आहे. जिल्हा परिषदेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयालगतच्या बचत भवनात तर पंचायत समित्यांची आरक्षण सोडत तहसील कार्यालयात काढली जाईल. जिल्ह्यात सन २०१२ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक झाली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट व गणक्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती-जमाती, महिलांसाठी आरक्षित जागा व नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (महिला आरक्षणासह) राखून ठेवायच्या जागा आणि उर्वरित सर्वसाधारण संवर्गातील महिलांसाठी राखीव जागांचे आरक्षण या सोडतीमध्ये निश्चित केले जाणार आहे. जि.प.मध्ये वर्षानुवर्षे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे फेरबदलासाठी भाजप-शिवसेनेने कंबर कसली आहे. आघाडीला वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कस लावावा लागणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीकरिता राखीव झाल्याने कोणाचीही सत्ता आली तरी अध्यक्षपदी अनुसूचित जातीचा उमेदवार आरूढ होईल. जागा अशा राहणार राखीव झेडपीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत अनुसूचित जमातींसाठी १२, अनुसूचित जातींसाठी ११ अशा २३ जागा राखीव राहणार आहेत. अनुसूचित जातींमध्ये प्रत्येकी ५ खुला प्रवर्ग आणि महिला तर अनुसूचित जमातींमध्ये प्रत्येकी ६ याप्रमाणे खुला प्रवर्ग आणि महिलांना संधी मिळणार आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण १६ जागा राखीव असून यात प्रत्येकी ८ जागा पुरूष-महिलांसाठी राखिव असतील, सर्वसाधारण प्रवर्गासाठी २० जागा राहणार असून प्रत्येकी दहा याप्रमाणे महिला आणि पुरूषांकरीता जागा राहणार आहेत. नेत्यांची राहणार मांदियाळीजिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी गट-गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. जिल्हा परिषदेसाठी बचतभवनात तर पंचायत समितीकरिता तहसील कार्यालयात सोडत काढली जाणार असल्याने इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. उत्सुकता शिगेला जि.प.,पं.सच्या गट व गणांच्या आरक्षण सोडतीचीसर्व राजकीय पक्षांना प्रतीक्षा लागली होती. अखेर त्यासाठी मुहूर्त जवळ आला आहे. त्यामुळे बुधवारी आरक्षण सोडतीकडे जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मिनीमंत्रालयासाठी आज सोडत
By admin | Published: October 05, 2016 12:15 AM