गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशपातळीवरील राजकारणात अमरावती जिल्ह्यातील स्त्रीशक्तीची छाप राहिली आहे. या लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत तीन महिला खासदाराची कारकीर्द बहारदार अन् कामगिरी दमदार राहिली आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीचा मान मिळालेल्या प्रतिभाताई पाटील या अमरावतीकरच... किंबहुना महिला खासदारांच्या दिमाखदार कामगिरीमुळेच जिल्ह्यास ‘ताईंचा जिल्हा’ अशी कायम ओळख राहिली आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघ सुदामकाकांचा दोन वर्षांचा कालखंड वगळता १९५२ ते १९९६ पर्यंतच काँग्रेसचा गड राहिला. त्यानंतर अनेक स्थित्यंतर मतदारसंघाने अनुभवले. विशेष म्हणजे, ज्या तीन महिला शक्तींना जिल्ह्याने बळ दिले, त्यांना उमेदवारी ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दिली आहे. महिला सक्षमीकरणाच्या नावाने डांगोरा पिटणाऱ्या अन्य राजकीय पक्षांनी जिल्ह्यातील स्त्रीशक्तीला राजकारणात बळ दिलेले नाही, हे वास्तव आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून काँग्रेसचा गड राहिलेला आहे. सुरुवातीच्या काळात सी.पी अॅन्ड बेरार अर्थात मध्य प्रांत असताना अमरावतीचे खासदार डॉ. भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांच्या निधनानंतर १९६५ मध्ये त्यांच्या पत्नी विमलाबाई देशमुख खासदार झाल्यात व जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार होण्याचा बहुमान मिळविला. सन १९८० ते १९८९ या कालावधीत सलग दोन वेळा उषाताई चौधरी जिल्ह्याच्या खासदार राहिल्या. त्यांच्या दमदार कारकीर्दीची राज्याच्या राजकारणावर छाप राहिली. त्यानंतर सन १९९१ ते १९९६ या कालावधीत प्रतिभाताई पाटील जिल्ह्याच्या खासदार झाल्यात न त्यांच्या दमदार कारकिर्दीने देशाच्या पहिल्या राष्ट्रपती होण्याचा बहुमानदेखील मिळविला.जिल्ह्यातील महिला खासदारांची अशी देदीप्यमान कारकीर्द राहिली आहे. त्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर बुलडाण्याचे खासदार असलेले आनंदराव अडसूळ यांचा अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश झाला. अलीकडच्या दोन दशकात २०१४ मध्ये अमरावती मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली होती.
अमरावती पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्लापूर्वीचा मध्य प्रांत असताना जिल्ह्याचे पहिले खासदार होण्याचा बहुमान १९५१ मध्ये काँग्रेसचे डॉ. पंजाबराव देशमुख यांना मिळाला. त्यांच्यानंतर १९५१ ते १९५७ कृष्णराव देशमुख व पुन्हा १९५७ ते १९६५ डॉ. पंजाबराव देशमुख आणि त्यांच्या निधनानंतर १९६५ ते १९६७ विमलाबाई पंजाबराव देशमुख खासदार झाल्या. १९६७ ते १९७७ के.जी. देशमुख , १९७७ ते १९८० नाना महादेव बोंडे, १९८० ते १९८९ उषाताई चौधरी, १९८९ ते १९९१ सुदामकाका देशमुख (भाकपा) व पुन्हा काँग्रेसच्याच प्रतिभाताई पाटील ह्या १९९१ ते १९९६ कालावधीत खासदार राहिल्या. यानंतर काँग्रेसला यशाने हुलकावणी दिली. हा मतदारसंघ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे.
सुदामकाकांनी थोपवला काँग्रेसचा रथतब्बल चार दशकानंतर सुदामकाका देशमुख या भाकपच्या लोकनेत्याने अमरावती लोकसभा मतदारसंघातला विजयी रथ थोपवला. ‘तुमचा गेरू अन् तुमचाच चुना, सुदामकाकांना निवडून आणा’ या हाकेला घराघरांतून साथ दिली गेली. विशेष म्हणजे, युवकांनी घराघरांतून एक- एक रुपया गोळा करून वर्गणी केली अन् निगर्वी व्यक्तिमत्त्वाने ऐतिहासिक विजय संपादीत केला. यानंतर पुन्हा प्रतिभाताई पाटील यांनी काँग्रेसची विजयी पताका उंचावली. त्यानंतर मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळविता आलेला नाही.