दिवाकर रावते : शिक्षक आघाडीचा विभागीय मेळावाअमरावती : राज्य विधिमंडळाचे विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून या सभागृहात शिक्षकांचे सर्वाधिक प्रश्न मांडले जातात. या सभागृहात शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य शिक्षकांच्या प्रश्नांसाठी तुटून पडतात. त्यामुळे विधानपरिषद हे शिक्षकांच्या हक्काचे सभागृह होय, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी येथे केले.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिक्षक आघाडीचे दोन दिवसीय विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला असून सोमवारी या मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रेय सावंत होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गृह राज्यमंत्री रणजित पाटील, माजी मंत्री वसुधा देशमुख, आ. श्रीकांत देशपांडे, माजी मंत्री भैय्यासाहेब ठाकूर, माजी आ. सुलभा खोडके, संजय खोडके, माजी खा. अनंत गुढे, माजी आ.नरेशचंद्र ठाकरे, नगरसेवक दिनेश बूब, प्रशांत वानखडे, सैय्यद राजीक, सामेश्वर पुसतकर आदी उपस्थित होते. यावेळी गोविंद देशपांडे आणि मीनाक्षी देशपांडे यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा पार पडला. पुढे बोलताना ना.रावते म्हणाले, विधानपरिषदेत शिक्षकांचे प्रश्न ऐकून थकलो आहे. आता यात तोडगा निघाला पाहिजे. आम्ही सत्तेत असलो तरी शिक्षकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. संस्था चालकांनी शासनाकडून अनुदान मिळवायचे पण; शिक्षकांना पूर्ण वेतन का नाही, असा सवालदेखील रावतेंनी उपस्थित केला. शासनाने शिक्षक भरती करून शिक्षकांना न्याय प्रदान करणे गरजेचे आहे. विनाअनुदानीत शाळांमध्ये शिक्षकांचे हाल झाले असून त्यांची काहीच किंमत उरली नाही. शिक्षकांना संरक्षण मिळाले पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे त्याकरिता सभागृहात लढावे लागेल. भावूक होता कामा नये, असे ना. रावते श्रीकांत देशपांडे यांना म्हणाले. शिक्षकांनी जो विश्वास टाकला तो सार्थकी लावण्याचे काम शिक्षक आमदारांनी करावे. विरोधकांना किंचितही संधी देऊ नका, असा सल्ला रावतेंनी दिला. दरम्यान आ. श्रीकांत देशपांडे, माजी मंत्री वसुधा देशमुख, अनंत गुढे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक विलास राऊत, सैय्यद राजीक यांनी केले.शिक्षकांपासून मध्यान्ह भोजन काढू : पाटीलसमाज आणि शिक्षकांमध्ये निर्माण झालेली दरी दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून येत्या काळात शिक्षकांपासून मध्यान्ह भोजन व्यवस्था काढली जाईल, असे ना. रणजित पाटील यांनी शब्द दिला. मध्यान्ह भोजन व्यवस्थेसाठी केंद्रीय पद्धत अथवा वेगळी व्यवस्था शासन करणार परंतु यापुढे मध्यान्ह भोजनात शिक्षकांचा सहभाग ठेवणार नाही, असे ना. पाटील यांनी स्पष्ट केले. शिक्षकांना आरोग्य सेवा घेताना सुलभता यावी, यासाठी स्मार्ट कार्ड लागू केले जाईल, असे ते म्हणाले.सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याने उपस्थित भारावलेआ. श्रीकांत देशपांडे यांचे वडील गोविंद व आई मीनाक्षी देशपांडे यांचा सोमवारी सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्याला मान्यवरांनी हजेरी लावताना आ. श्रीकांत देशपांडे यांच्या कर्तृत्वाचा आलेख शिक्षकांसमोर मांडला. या सोहळ्याला विभागातील शिक्षकवृंदानी उपस्थिती होती.
विधानपरिषद म्हणजे शिक्षकांच्या हक्काचे सभागृह
By admin | Published: April 19, 2016 12:06 AM