अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्याचे वास्तव असल्याचे सर्वश्रूत आहे. मात्र, मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रसायनशास्त्र विभाग परिसरात एका श्वानावर अचानक बिबट्याने हल्ला केला. यावेळी कर्तव्यावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने आरडाओरड करताच बिबट घटनास्थळावरून पळाला.
गत महिन्यात २ मे रोजी विद्यापीठात दोन बछडे मस्त खेळताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे विद्यापीठात बिबट्यासह दोन बछड्यांचे वास्तव असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन वर्षापूर्वी विद्यापीठात श्वानांची संख्या अधिक होती. मात्र, बिबट्यांच्या शिकारीमुळे मोजकेच श्वान शिल्लक राहिले आहेत.
विद्यापीठ प्रशासनाने बिबट, रानडुक्कर, हरिण, नीलगाय आदी वन्यजीवांचा मुक्तसंचार असल्यामुळे कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घड नये, यासाठी काही क्षेत्राला जाळीचे संरक्षण कुंपण घातले आहे. ज्या भागातून बिबट्याचा मुक्त संचार आहे, त्याच भागात संरक्षण कुंपण निर्माण करण्यात आले आहे. कुलगुरू बंगल्यानंतर रसायनशास्त्र विभाग, शारीरिक शिक्षण विभाग, जेआरएफ होस्टेल आदी भाग जंगल क्षेत्रालगतचे आहे. विद्यापीठात काही ठिकाणी वनविभागाकडून बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहे. विद्यापीठाने जखमी श्वानावर उपचार सुरू केला आहे. सायंकाळी अथवा रात्रीच्या वेळेस सुरक्षा रक्षकांना जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावावे लागत आहे. प्रमोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात प्रवीण भोळे, चंदू दांडगे,आकाश चव्हाण, सागर पाटे, हरीश खेरडे आदी सुरक्षांचे कर्तव्य बजावत आहे.
-------------------
विद्यापीठात लागले ट्रॅप कॅमेरे
वनविभागाकडून बिबट्यासह अन्य वन्यप्राणी असल्याने त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी विद्यापीठात मोजक्याच जागी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांवर वनपाल, वनरक्षकांचे नियंत्रण आहे. दोन ते तीन दिवसाआड कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येते. विशेषत: बिबट्यांबाबतची माहिती वरिष्ठांकडे पाठविली जात असल्याचे वडाळी वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर यांनी सांगितले. बिबट्याने श्वानाला जखमी केल्याबाबतची माहिती वजा तक्रार मिळाली नाही.
--------------