नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागातील सेमाडोह रायपूर मार्गावरील तलावाजवळ मंगळवारी सकाळी नऊ वाजता बिबट बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
सेमाडोह परिक्षेत्रातील रायपूर मार्गावरील वनखंड क्रमांक १७९ मध्ये रस्त्याच्या ५० मीटर अंतरावर व्याघ्र प्रकल्पाचा तलाव आहे. त्यानजीक हा बिबट बेशुद्ध अवस्थेत आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच सिपना वन्यजीव विभागाचे सहाय्यक वन संरक्षक कमलेश पाटील घटनास्थळी रवाना झाल्याचे सांगण्यात आले.तोंडातून फेस, विषबाधा की खेळताना पडला?
युवा बिबट मृत असल्याची चर्चा रंगली असताना तो बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. बिबटच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात फेस पडून असल्याने खेळताना झाडावरून पडल्याने बेशुद्ध झाला की नजीकच्या तलावात असलेल्या पाण्यात कुणीही शिकार लावल्यामुळे बेशुद्ध पडला याची माहिती आता उघड होणार आहे.सेमाडोहनजीक बिबट बेशुद्ध अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती आली आहे. मी घटनास्थळी जात असून त्यानंतर सर्व प्रकार स्पष्ट होईल
- कमलेश पाटील, सहाय्यकवन संरक्षक, सिपना वन्यजीव विभाग परतवाडा