वरूड (अमरावती) : तालुक्यातील शेकदरी वर्तुळातील पिंपळशेंडा शेतशिवारात बानाइत यांच्या शेतात एका ७० वर्षीय शेतकऱ्यावर अचानक बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. वनविभागाने पंचनामा करून मृताच्या वारसास पाच लाख रुपयांची तातडीची मदत केली.
प्राप्त माहितीनुसार, माधव राजाराम बानाइत (७०, रा. शेंदूरजनाघाट) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत शेतकऱ्याचे पिंपळशेंडा शेतशिवार शेकदरी वन वर्तुळात शेत आहे. सदर मृत शेतकरी शेतात गेले होते. परंतु रात्र होऊनही परत आले नाहीत म्हणून मृताच्या मुलाने शेतात जाऊन पाहिले असता वडिलांचा मृतदेह दिसला. याबाबत पोलीसांना माहिती दिली.
घटनास्थळावर शेंदूरजना घाट ठाणेदार सतीश इंगळे यांनी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा उत्तरीय तपासणीकरिता आणला होता. तर वनविभागाला माहिती दिली. सोमवारी सकाळी प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, वनपाल अजय खेडकर, मंगेश जंगलेंसह अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. मृताच्या वारसाला पाच लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सोमवारी देण्यात आला. ही कार्यवाही उपवनसंरक्षक अमित मिश्रा, सहायक वनसंरक्षक अमोल चौधरी, वनपरिक्षेत्राधिकारी सुहास चव्हाण, शेकदरीचे क्षेत्र सहायक भटकर आदींनी केली.
हल्ला केला कुणी, वाघ की बिबट?
माधव राजाराम बानाइत या ७० वर्षीय शेतकऱ्याचा वन्यप्राण्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. वन विभागाच्या अंदाजानुसार हा हल्ला बिबट्याने केला असावा. मात्र घटनास्थळी पायाचे ठसे आढळून आले नाही. त्यामुळे मृत शेतकऱ्यावर हल्ला वाघाने की बिबटाने केला, हे कळू शकले नाही. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले असून रात्रीच्या वेळी ओलिताचा प्रश्न निर्माण झाला. शेतमजूरसुद्धा शेतावर जाण्यास घाबरत आहेत.