अमरावती : गत १५ दिवसांपूर्वी बिबट जोडप्यांच्या आगमनाने दहशतीत असलेल्या मंगलधाम कॉलनीवासीयांना सोमवार, २० नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता पुन्हा बिबट्याने चक्क रस्त्यावर ठिय्या मांडल्याने अनेकांची भंबेरी उडाली. तास, दीड तासाच्या ठिय्यानंतर बिबट जंगलाकडे गेल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. मंगलधाम कॉलनीलगतच्या साऊरकर फ्लॅट स्किमच्या मुख्य रस्त्यावर बिबट्याने ठिय्या मांडला होता, हा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नागरी वस्तीत बिबट येणे ही बाब आता अंबानगरीवासीयांसाठी नवी राहिली नाही. व्हीएमव्ही परिसरात बिबट अद्यापही ठाण मांडून आहे. या भागातील बिबट गत १५ दिवसांपासून वन कर्मचाऱ्यांना दिसून आला नाही, अशी माहिती आहे. परंतु, व्हीएमव्ही भागातील बिबट जंगलात परत गेला अथवा नाही, हे वन विभाग ठामपणे सांगू शकत नाही. तसेच मंगलधाम कॉलनीत १५ दिवसांपूर्वी सलग दोन दिवस बिबट जोडप्यांचे दर्शन झाले होते. तेव्हा हे बिबट वराह, कुत्र्यांच्या शिकारीसाठी आले असावे, असा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. मात्र शहरालगत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, झाडाझुडपांचा नाश केला जात आहे. त्यामुळे बिबट व अन्य वन्यप्राण्यांना शिकार शोधण्यासाठी जंगलाबाहेर पडावे लागत आहे. व्हीएमव्ही परिसर, मंगलधाम कॉलनी या भागात आजही बिबट्याच्या दहशतीत नागरिक आहेत.
वराहाच्या कळपावर झडप
मंगलधाम कॉलनीत साऊरकर सदनिका भागातील मुख्य रस्त्यावर सोमवारी रात्री ठिय्या मांडून बसलेल्या बिबट्याने हळूच लगतच्या वराहाच्या कळपावर झडप मारली. त्यानंतर वराहाचे पिल्ले सुसाट धावत सुटले, असा क्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे बिबट्याला जंगलात खाद्य मिळत नसल्याने शिकारीच्या शोधार्थ तो नागरी वस्तीकडे येत असल्याचे स्पष्ट होत आहे.