लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट्याचा संचार ही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र, गत काही दिवसांपासून बिबट्याच्या कुलगुरूंच्या बंगल्याकडे फेऱ्या वाढल्या आहेत. श्वानाच्या शिकारीसाठी कुलगुरू बंगल्याच्या मागील बाजूस तो दबा धरून बसत असून, सुरक्षारक्षकांच्या जीविताला धोका मानला जात आहे. गत आठवड्यात शुक्रवारी रात्री ८ वाजता बिबट कुलगुरू बंगल्याच्या मागे आढळून आला, हे विशेष.विद्यापीठाच्या तलाव परिसरात २०१७ मध्ये बिबट्याने गायीची शिकार केल्याचे निदर्शनास आले होते. तेव्हापासून विद्यापीठात बिबट्याचे जोडपे दिसून येत आहे. विद्यापीठाने बिबट्याचा संचार असलेल्या भागात फलक लावून प्रवेश मनाई केली आहे. असे असले तरी बिबट्या हा शिकार करण्यासाठी परीक्षा विभाग, कुलगुरू बंगला, कँटीनपर्यंत येत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून सिद्ध झाले आहे. अतिथीगृह, कुलगुरूंच्या बंगला परिसरात बिबट्या आढळून येणे ही नित्याचीच बाब झाली आहे.
विद्यापीठात घनदाट वृक्ष, पाणी, शिकारही गत पाच वर्षांपूर्वी विद्यापीठात एक बिबट्या आढळून आला होता. आता बिबट्यांची संख्या १० च्या पुढे गेली आहे. बिबट्याला दडून बसण्यासाठी घनदाट वृक्ष, झाडी, पाणी आणि शिकारीची सोय असल्याने ते विद्यापीठ सोडून जंगलात जात नाही. मात्र, विद्यापीठात श्वानांची संख्या रोडावल्याने बिबट्या शिकारीसाठी परिसर पिंजून काढत आहेत.
पिंजरे लागले, पण बिबट्या अडकेना विद्यापीठात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्याच्या संचार मार्गावर वन विभागाने पिंजरे लावले. पिंजऱ्यात शेळीदेखील बांधली; पण बिबट्या पिंजऱ्यात अडकत नसल्याने कालांतराने वन विभागाने हे पिंजरे हटवून घेतले. बिबट्यांवर पाळत ठेवण्यासाठी वन कर्मचारी अधूनमधून विद्यापीठात गस्त घालतात. मात्र, विद्यापीठात एखाद्यावेळी बिबट्यामुळे अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अलीकडे त्याच्या हालचालींंवरून दिसून येते.