शिकार नेली झाडावर, नागरिकांमध्ये धास्ती
पोहरा बंदी : लगतच्या हातला गावालगत नदीकाठच्या गोठ्यातील दोन वासरांची बिबट्याने शिकार केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. या घटनेने हातला गावातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत पोहरा वर्तुळात येणा०या हातला गावालगत नदीकाठी श्यामराव बावनकर यांच्या मालकीचा गोठा आहे. त्या गोठ्यात शिरून बिबट्याने तेथील गुरांच्या कळपातून तीन वर्षे वयाची दोन गीर जातीची मादी वासरे फरफटत नेऊन नदीकाठच्या झाडांवर ही शिकार चढविली. वासराच्या शरीराच्या काही भागांचे लचके तोडलेले होते.
बिबट्याने दोन वासरांची शिकार केल्याची माहिती रविवारी सकाळी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांना देण्यात आली. परसोडा बीटचे वनरक्षक प्रदीप आखरे, पोहरा बीट वनरक्षक डी.ओ. चव्हाण, वनमजूर शेख रफीक, संरक्षण मजूर सुमेरसिंह जाधव यांनी घटनास्थळ गाठून त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृत वासराला खाली काढले. घटनास्थळाचा पंचनामा केला. श्यामराव बावनकर यांनी वनविभागाकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज सादर केला आहे. बिबट्याच्या सततच्या हैदोसामुळे जंगलालगतच्या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.